सुवर्णक्षणांनी नटलेला गुणवंतांचा गौरवसोहळा

0
12

नागपूर दि.२४ : : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०५ वा दीक्षांत समारोह शनिवारी थाटात पार पडला. या कौतुक सोहळ्यात सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यापीठातील गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. विद्वत्तेचे अनेक सोहळे अनुभवलेल्या डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात गुणवंतांच्या प्रतिभेला सन्मानित करण्यात आले व सर्व उपस्थित सुवर्णक्षणांचे साक्षीदार झाले. प्रत्येक गुणवंत व त्यांच्या आप्तेष्टांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले.
दीक्षांत समारंभात २०१७ च्या हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ४८३९१ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान करण्यात आल्या. तसेच विविध परीक्षांमधील १७२ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना ३१२ सुवर्ण पदके, ४३ रौप्य पदके, १०२ पारितोषिके अशी एकूण ४५७ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील १५२ विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले.
कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी १०५ व्या दीक्षांत समारंभाचे प्रास्ताविक केले. राष्ट्रसंतांच्या पथदर्शक विचारांवर वाटचाल करण्याचा संकल्प विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरू असून दर्जादेखील वाढला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी मंचावर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव डॉ.पूरणचंद्र मेश्राम, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.मिलींद बारहाते, डॉ.जी.एस.खडेकर, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.विनायक देशपांडे, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.हरजितसिंग जुनेजा, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकांत कोमावार व आंतरशास्त्रीय विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ.राजश्री वैष्णव प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा.कोमल ठाकरे व वर्षा देशपांडे यांनी संचालन केले.