पंकजांना धक्का; ‘वैद्यनाथ’चा परवाना दहा दिवसांसाठी निलंबित

0
7

बीड,दि.२५ :-ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या पांगरी (ता. परळी) येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा परवाना अन्न प्रशासनाने दहा दिवसांसाठी निलंबित केला आहे. त्यामुळे कारखान्याच्या तब्बल ४० हजार मेट्रिक टन उसाच्या गाळपाला फटका बसणार आहे. कारखान्याच्या तपासणीदरम्यान आढळलेल्या विविध त्रुटींबाबत सुधारणा नोटीस देऊनही त्याकडे केलेले दुर्लक्ष कारखाना प्रशासनाच्या अंगलट आले आहे. राज्यात सत्तेत असलेल्या पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर झालेल्या या कारवाईने हा पंकजांना धक्का समजला जात आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये वैद्यनाथ कारखान्यात उसाच्या रसाची टाकी फुटून झालेल्या अपघातात सात कामगारांचा मृत्यू झाला होता. यानंतर कारखान्याची औद्योगिक सुरक्षा विभागासह अन्न प्रशासनाकडूनही तपासणी करण्यात आली होती. अन्न प्रशासनाच्या गुप्तवार्ता विभागाच्या मुंबई येथील पथकाने ही तपासणी केली होती. त्या वेळी कारखान्यात असलेल्या काही त्रुटींबाबत अन्न प्रशासनाने वैद्यनाथ कारखाना प्रशासनाला सुधारणा नोटीस काढली होती. साखरेचे काही नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले होते. यानंतर कारखान्याने अन्न प्रशासनाला पत्र पाठवून सुचवल्याप्रमाणे सुधारणा करण्यात आल्याचे सांगितले होते. यानंतर पुन्हा १५ मार्च रोजी गुप्तवार्ता शाखा व बीडच्या सहायक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कारखान्याची तपासणी केली. यामध्ये सुचवलेल्या त्रुटी दुरुस्त न केल्याचे आढळून आल्याने सहायक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी ११ ते २० एप्रिल २०१८ या दहा दिवसांसाठी कारखान्याचा परवाना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.