30 कंटेनर असलेली रेल्वेगाडी नागपूरवरून बांगलादेशला रवाना

0
15

नागपूर,दि.25 – उपराजधानीतून थेट बांगलादेशापर्यंत रेल्वेची मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेल्या कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (कॉनकॉर) अजनी आंतरराष्ट्रीय डेपोतून थेट बांगलादेशसाठी जलद मालवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ३० कंटेनर असलेली पहिली मालगाडी शुक्रवारी रात्री उपराजधानीतून रवाना झाली.बांगलादेशात उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाची वानवा असून वस्त्रोद्योग, पोल्ट्री फार्मला लागणाऱ्या कच्च्या मालासोबतच तांदळाची मोठी मागणी आहे. ही निकड विदर्भातून भागविली जाऊ शकते. हिंगणघाटजवळील करंजी येथील श्रीनिवासा फार्मसच्या प्रकल्पात कोंबड्यांच्या खाद्यासाठी उपयुक्त ‘डिओइल्ड सोया केक’ तयार केले जाते. श्रीनिवासाच्या संचालकांनी बांगलादेशला भेट दिली असता मोठ्या प्रमाणावर मालाला मागणी नोंदविण्यात आली. कंपनीने मालपुरवठ्यासाठी स्प्लेंडिड लॉजिस्टिक्‍ससह अजनी कंटेनर डेपोसोबत संपर्क साधला. डेपोमार्फत मालवाहतुकीसंदर्भात चाचपणी करण्यात आली. भारत सरकारने मालपुरवठ्यासंदर्भात बांगलादेश शासनासोबत सामंजस्य करार केला. यानंतर शुक्रवारी रात्री पहिली ट्रेन रवाना झाली. कॉनकॉरच्या मध्य क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक अनुपकुमार सत्पथी, कस्टम्स विभागाचे उपायुक्त आर. वाय. कनौजिया यांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेला रवाना केले. ही रेल्वे २६ मार्च रोजी कोलकाता येथे पोहोचेल. तिथून पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री हिरवी झेंडी दाखवून गाडीला पुढे रवाना करतील. बांगलादेशच्या बंगबंधो स्थानकावर कस्टम तपासणीनंतर हा माल पुढे ठरलेल्या कंपन्यांना पोहोचता करण्यात येईल. तर, रिकामे झालेले कंटेनर त्याच रेल्वेतून अजनी डेपोत परत येतील. अनुपकुमार सत्पथी यांनी ही सेवा सुरू करणे अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. प्रायोगिक तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या या मालगाडीत ३० कंटेनरमधून १२०० टन माल बांगलादेशात पाठविण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात ९० कंटेनरमधून माल पाठविण्याची तयारी करण्यात आली आहे. सोया केकला दरमहा तब्बल १ लाख टनापर्यंतची मागणी आहे.