विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती करणार, ७ एप्रिलपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात

0
54

पंढरपूर,दि.25 : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मंदिर परिसरासह, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेचे काम हाती घेतले असून, खासगी कंपनीला स्वच्छतेचा ठेका देण्यात येणार आहे़ खासगी कंपनीचे कर्मचारी ७ एप्रिलपासून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करणार आहेत.वारकर्यांनी घरातून निघताच पांडुरंगाच्या पवित्र स्थळी चाललो आहोत़ ते पवित्र स्थळ अपवित्र होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून सरासरी रोज ३० हजारांपेक्षा जास्त भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरीत येतात़ मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग व वाळवंटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व अन्य कचरा पडलेला असतो़. त्याचा त्रास भाविकांनाच होतो़ याबाबत काही भाविकांकडून नाराजी व्यक्त केली जाते़. विठ्ठल मंदिर समितीने आजवर मालकीच्या परिसराबाहेर स्वच्छतेसाठी कधी पाऊल उचलले नव्हते़.मंदिर समितीला उत्पन्न मिळते म्हणून नगरपरिषदनेही फारसे लक्ष दिले नाही. या वादातून चार वर्षांपूर्वी वार्षिक उत्पन्नाच्या ५० टक्के रक्कम स्वच्छता, पाणी, दिवाबत्तीसाठी द्यावी, अशी मागणी नगरपरिषदेने मंदिर समितीकडे केली होती़. त्यानंतर मंदिर समितीने काही प्रमाणात स्वच्छतेसाठी हातभार लावत शहरातील मठ, मंदिरे, ठिकठिकाणी शौचालय बांधण्यासाठी अनुदानही दिले़.आता मंदिर समितीने मंदिर परिसराच्या स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला वार्षिक ठेका देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे.