खुर्ची टिकवण्यासाठी निर्णय घेणे बंद केल्यासच जनतेचे भले; पंकजा मुंडे

0
15

औरंगाबाद,दि.25(विशेष प्रतिनिधी)-महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी मी एक आमदार आहे. मंत्रिमंडळातील पहिल्या पाच मंत्र्यात माझा समावेश आहे, असे असताना महिलांच्या अस्मितेसाठी, आरोग्यासाठी काही केले नाही. तर माझ्या मंत्रीपदाला काहीही अर्थ राहणार नाही. खुर्चीला जपण्याचे निर्णय घेणे राज्यकर्ते जेव्हा बंद करतील त्या दिवशी जनतेचे जीवन उंचावलेले असेल. त्यासाठी निर्णय घेण्याची तयारी असायला हवी, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

औरंगाबाद येथे महिला बचत गटांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. नारी आणि नर जिथे सुरक्षित असतो तो समाज पुढारलेला असतो. त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ आणि मुलीच्या जन्म दराचे प्रमाण घटले आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातून सुरुवात तीन वर्षांपासून सुरुवात झाली. ती जर सत्तर वर्षांपूर्वी झाली असती तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.बेटी बचाओ, बेटी पढाओ, माझी अस्मिता, जलयुक्त शिवार, स्वच्छता मोहीम आशा जनतेच्या मनातल्या योजना भाजप सरकारच्या काळात सुरू झाल्या. जनतेला घरात स्वच्छतागृह बांधण्यासाठी लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांना आवाहन करावे लागले, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. मुंडे म्हणाल्या, माझी अस्मिता या योजनेअंतर्गत देण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन बचत गटाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. तसेच बचत गट सक्षम करण्यासाठी शून्य टक्के दराने कर्ज देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.बचत गटाच्या महिलांनी शंभर टक्के कर्ज परतावा केला. बचत करणे ही महिलेची ताकत आहे. ती कोणाच्याही उपकारात राहत नाही. स्वाभिमान टिकून राहावा यासाठी घरकुलाला महिलांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तीन वर्षात 40 ते 50 प्रदर्शने झाली. बचत गटाच्या उत्पादनाचा दर्जा सुधारला आहे. राज्यात आता प्लास्टिक बंदी केली. त्यामुळे कापडी पिशव्या तयार करायचे काम महिला बचत गटांना देण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.