महिलांनी महिलांच्या समस्यांविषयी जागृत रहावे

0
10

सडक अर्जुनी,दि.25 : ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीप्रमाणे मुलगी शिकली व शिक्षित झाली तर माहेर आणि सासर अशी दोन्ही कुटूंब शिक्षित करते. अशिक्षितपणामुळे गरोदरपणात स्वत: काळजी घेऊ शकत नाही. त्यामुळे समाजात स्त्री भृण हत्या सारख्या वाईट गोष्टी समाजात घडतात. शिवाय त्या अशिक्षितपणामुळे आपल्या देशात माता मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणून महिलांनी महिलांना उद्भवणाऱ्या समस्यांविषयी जागरूक राहावे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर यांनी केले.
ग्राम डोंगरगाव येथील समाज मंदिर परिसरात गुरूवारी (दि.२२) एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत आयोजित महिला मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उद्घाटन सरपंच दिनेश हुकरे व उपसभापती राजेश कठाणे यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन वैद्यकीय अधिकारी रेखा नंदेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी विनोद लोंढे, उपसरपंच तुकाराम राणे, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा खोटेले, मोहन खोटेले, इंदल फुल्लूके, संजय डोये, अमोल बन्सोड, गीता कठाने, खेमेश्वरी शिवणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अशोक हुकरे उपस्थित होते.
मेळाव्यात गरोदर मातांना घ्यावयाच्या सकस आहारातील पदार्थांची प्रदर्शनी लावण्यात आली होती. गरोदर माता व किशोरवयीन मुलींना द्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रकारे अंगणवाडी -बालवाडीतील चिमुकल्यांचे नृत्य तसेच महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांसाठी असणाºया विविध योजनांची माहिती देण्यात आली. प्रास्ताविक एस.एस. बागडे पर्यवेक्षीका यांनी मांडले. संचालन देवराम डोये यांनी केले. आभार पुष्पा खोटेले यांनी मानले. कार्यक्रमासाठी शकुंतला खोटेले, उषा लांजेवार, शामलता हुकरे, नम्रता कोरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या.