प्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर – मुख्यमंत्री

0
94

नागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे पोलिस निवासस्थानांचे निर्माण कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नागपूर शहर पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक व सुसज्ज अशा पोलीस भवनाचे भुमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित समारंभात मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निशा सावरकर, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव एस.के. श्रीवास्तव, पोलीस महासंचालक सतिश माथुर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् तसेच आमदार सर्वश्री प्रकाश गजभिये, डॉ. मिलींद माने, सुधाकर देशमुख, परिणय फुके तसेच माजी पोलीस आयुक्त टी.श्रृगांरवेल, उल्हास जोशी, अंकुश धनविजय, आर.एस.शर्मा तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई येथे काही पोलीस ठाण्यात आठ तासांची ड्युटी हा प्रयोग सुरु करण्यात आला आहे. 40 वर्षावरील पोलिसांची आरोग्य तपासणी, पोलिसांच्या कुंटुंबासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. तसेच केवळ तीन वर्षांत पोलीस दलात विविध पदावर मोठी भरती करण्यात आली. पोलीस दलातील शंभर टक्के रिक्त जागा भरण्यालाही शासनाकडून मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस दल हा ‘परिवार’ आहे ही भावना समोर ठेऊन पोलिसांच्या गृह निर्माणाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येत असून निवृत्तीनंतरही हक्काचे घर असावे यासाठी सुलभ कर्ज तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येत आहे. नागपूर शहरात पंधराशे घरांचा प्रकल्प सुरु होणार असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहर व पोलीस फोर्स स्मार्ट करण्यासोबत आधुनिक व्यवस्था निर्माण करुन शहर व जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी दिली.

पोलीस दलाचा प्रभाव आणि परिणामकारकता वाढविण्यासोबतच गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा व तंत्रज्ञान पोलीस दलाला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अत्यंत आधुनिक सीसीटीएनएस सुविधा पूर्ण करुन नागरिकांना ई-तक्रार नोंदणीची सुविधा सुरु करणारे पहिले राज्य ठरले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  येथे केले.

पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम् यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात नागपूर शहर पोलिसातर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रभावी पोलिसींगबद्दल माहिती देतांना तंत्रज्ञानाचा वापर करुन पोलिसांचे मनोबल वाढविण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळेच गुन्हेगारींचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. तसेच जनतेचा विश्वास संपादन करुन नागपूर ट्रॅफीक क्लब, ई-चलन, स्मार्ट पोलीस स्टेशन आदी उपक्रमामुळे पोलिसांची प्रतिमा बदलण्यास मदत झाली आहे. ‘पोलीस स्मार्ट तर शहर स्मार्ट’ यानुसार विविध सुविधा निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. ‘पोलीस भवन’ ही पोलीस आयुक्तालयाची अत्याधुनिक सुविधा असलेली इमारत येत्या दोन वर्षात पूर्ण होऊन राज्यातील उत्कृष्ट सुविधा असलेली इमारत म्हणून ओळखली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नागपूर पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावलेले टी. श्रृगांरवेल, उल्हास जोशी, अंकुश धनविजय, आर.एस.शर्मा तसेच वास्तुरचनाकार व कंत्राटदार यांचा गौरव करण्यात आला. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयाच्या नवीन भवन इमारतीचे विधिवत भुमीपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपायुक्त राहुल माकनीकर यांनी तर आभार प्रदर्शन सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी केले.