कर्नाटक विधानसभा : 12 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान तर 15 मे रोजी होणार मतमोजणी

0
7

नवी दिल्ली,दि.27(विशेष प्रतिनिधी) – कर्नाटकमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत जाहीर केल्या. त्यानुसार कर्नाटक विधानसभेसाठी एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 12 मे रोजी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.दरम्यान निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपचे आयटी सेलप्रमुख अमित मालवीय यांनी ट्वीटरवर तारखा जाहीर केल्या. त्यासंदर्भात काही माध्यमांनी बातम्याही दिल्या. निवडणूक आयोगाने याप्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.मालवीय यांचे ट्वीटही लगेच व्हायरल झाले.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

17 एप्रिल – अधिसूचना जारी

24 एप्रिल – उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

25 एप्रिल – उमेदवारी अर्जांची छाननी
27 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख

12 मे – मतदान

15 मे – मतमोजणी

विधानसभेच्या 224 जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे. सिद्धरमैय्या मुख्यमंत्री आहेत. भाजप याठिकाणी भ्रष्टाचार आणि लिंगायत समाजाला धर्माची दर्जा देण्याचा मुद्दा उचलू शकते. गेल्या दोन महिन्यांत राहुल गांधी यांनी चार वेळा कर्नाटकचा दौरा केला आहे. तर भाजपाध्यक्ष अमित शाहदेखिल गेल्या महिनाभरात दोन वेळा कर्नाटकला गेले आहेत. सोमवारी दुसऱ्यांदा ते कर्नाटकात पोहोचले. एका दिवसांत सात कार्यक्रमांत त्यांनी उपस्थिती लावली. ते लिंगायत आणि दलित समुदायाशी संबंधित मठांचा दौरा करत आहेत.