कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळय़ात

0
13

गोंदिया,दि.२८-गोंदिया पंचायत समितीचा कंत्राटी कनिष्ठ अभियंता स्वप्नील देवीदास तिरपुडे याला पाच हजाराची लाच स्वीकारताना २७ मार्च रोजी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
तक्रारकर्ता हा मजूर असून त्याने पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकूल मंजूर होण्यासाठी डिसेंबर २0१७ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. फेब्रुवारी २0१८ मध्ये त्याला घरकूल मंजूर झाले असून १ लाख ३0 हजार रूपयाचा निधी शासनाकडून मिळणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता ३0 हजार रूपये तक्रारकर्त्याच्या बॅंक खात्यात जमा झाल्यानंतर तक्रारकर्त्याने बांधकामाला सुरवात केली. दरम्यान पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता तिरपुडे हे बांधकामाचे फोटो घेण्याकरीता आले व बांधकामाचा दुसरा हप्ता तयार करून बीलाची रक्कम बॅंक खात्यात जमा करण्याकरीता त्यांनी तक्रारकर्त्याकडे दहा हजार रूपयाची लाच मागितली. परंतु तक्रारकर्त्याला लाच द्यायची नसल्याने त्यांनी गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली.
दरम्यान २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने चांदणीटोला येथे सापळा रचून आरोपी कनिष्ठ अभियंता तिरपुडे याला तक्रारकर्त्याकडून पाच हजार रूपये लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्यावर गोंदिया ग्रामीण पोलिसात लाचलुचतपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक दिलीप वाढणकर, प्रमोद चौधरी, स. फौ. दिवाकर भदाडे, पो.ह.राजेश शेंद्रे, प्रदिप तुळसकर, रंजीत बिसेन, डिगंबर जाधव, नितीन रहांगडाले, वंदना बिसेन, देवानंद मारबते यांनी केली.