ग्रामपंचायतीच्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्‍या पतीची निर्घृण हत्या

0
13

यवतमाळ,दि.28 – पारवा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवार, दि. २७ मार्च रोजी दुपारी शहरालगतच्या पारवा शिवारात घडली. तुलसीदास ऊर्फ महेश हरिदास गावंडे वय ४२ वर्ष रा. पारवा असे मृतकाचे नाव आहे.

या प्रकरणी राज ठाकूर, मुन्ना ठाकूर, विनोद चपरीया, संजय चपरीया, सुनील देवतळे, हनुमान पेंदोर, भुपेंद्र उर्फ गोपी शिबलकर, शुभम टेकाम, सुमेद उर्फ पंड्या मेश्राम, प्रवीण भगत, भीमराव अवथरे सर्व रा. पारवा आणि सुनिल पाली उर्फ कुंभेकर रा. कारली यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पारवा येथील सरपंच नलिनी गावंडे यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, दि. २६ जानेवारी रोजी पारवा येथे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या वादावरून गावातील काही नागरिकांनी सरपंच गावंडे याच्या घराची तोडफोड केली होती. तेव्हापासून गावंडे कुटूंबीय यवतमाळातील पाटीपूरा येथे आपल्या सासू-सासऱ्यांकडे राहत होते. मंगळवार, दि. २७ मार्च रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास तुलसीदास गावंडे गावातील समाज मंदिराकडे फिरण्यासाठी गेले होते. अशातच मुलगा मयूर व पुतण्या सम्यक दोघेही यांच्या पाठीमागे समाज मंदिरजवळ गेले असता तुलसीदास गावंडे याला गावातील अंगणवाडीजवळ राज ठाकूर, मुन्ना ठाकूर, विनोद चपरीया यांच्यासह नऊ ते दहा जण तलवार, चाकू व शस्त्राने मारहाण करतांना दिसून आले. त्यामुळे मुलगा मयुर व पुतन्या सम्यक या दोघांनी घराकडे धाव घेवून याबाबतची माहिती आई नलिनी गावंडे हिला दिली. अशातच नली्रिनी गावंडे यांनी अंगणवाडीकडे धाव घेतली असता सदर मारेकरी तलवारी, चाकू, कोयता आणि लोखंडी रोडने पती तुलसीदास गावंडे यांना मारहाण करीत असतांना आढळून आले.

त्यावेळी नलिनी गावंडे यांनी आरडाओरड केली असता गावकऱ्यांनी धाव घेतली. गावकऱ्यांना पाहून मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने तुलसीदास गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेती माहिती गावकऱ्यांना पोलिसांनी दिली. त्यावेळी पो. नि. मुकुंद कुळकर्णी, एपीआय गौरख चौधर, नंदकुमार आहिरे, पाचकवडे आदींसह अधिकारी कर्मचाऱ्यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान घटनास्थळाची पाहाणी करून पंचनामा करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.