परीक्षेनंतरही शाळा भरवण्याचा निर्णय मागे; शिक्षणमंत्री

0
10

मुंबई,दि.28- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत वार्षिक परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तशा सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 9 वीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन 30 एप्रिलपर्यंत सुरू ठेवावे, असा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाने काढला होता. अचानक आलेल्या या आदेशामुळे शाळांचे नियोजन तर कोलमडणार होतेच, पण अनेकांचे गावाला जाण्याचे बेतही रद्द केले होते. परिणामी या निर्णयाबाबत सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात होती.राज्यातील सर्व शाळांमध्ये दीर्घ सुट्यांच्या संदर्भात सुसूत्रता राहावी, तसेच दीर्घकालीन सुट्ट्यांचा कालावधी निश्चित करण्याच्या उद्देशाने राज्य विद्या प्राधिकरणाने हा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करून उन्हाळ्याची सुटी लागू करावी, असे स्पष्ट करण्यात आले होते.