खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक- डॉ.अनिरुध्द कडू

0
9

गोंदिया,दि.२८ : क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दर महिन्याला प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक आहे. असे प्रतिपादन नागपूर विभागीय आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.अनिरुध्द कडू यांनी केले.
जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून २४ मार्च रोजी आयएमएचे सर्व सदस्य तसेच जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी सी.एम.ई.चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.कडू बोलत होते. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे, आयएमएचे अध्यक्ष डॉ.संजय अग्रवाल, डॉ.दिपक बाहेकर, डॉ.घनश्याम तुरकर, डज्ञॅ.पदमीनी तुरकर, डॉ.भुस्कूटे, डॉ.निलेश जैन, डॉ.शिरीष रत्नपारखी, डॉ.बग्गा, डॉ.ग्यानचंदानी, डॉ.देवाशिष चॅटर्जी, डॉ.कुदळे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.कडू पुढे म्हणाले, क्षयरुग्ण बरा होण्यासाठी डॉटस् उपचार पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. सर्वांच्या सहयोगाने क्षयरुग्ण बरा होवू शकतो असे सांगितले.
डॉ.दयानिधी म्हणाले, दर महिन्याला आपल्याकडे औषधोपचार घेत असणाऱ्या क्षयरुग्णांची माहिती शासकीय रुग्णालयात देणे बंधनकारक आहे. शासकीय रुग्णालयात उपलब्ध असलेला औषधोपचार व निदानासाठी उपलब्ध सिबीनॅट मशिनचा २४ तास व सातही दिवस उपयोग करुन घेण्यात यावा. त्यासाठी क्षयरुग्णांचे थुंकी नमूने पाठविण्यात यावे आणि जास्तीत जास्त प्रमाणात गरीब रुग्णांना त्याचा फायदा करुन देण्यात यावा असे सांगितले.
डॉ.काळे म्हणाले, क्षयरुग्णाच्या मनात असलेली भिती दूर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत क्षयरोगाबाबत जनजागृती करण्यात येत असून यात सर्वांचे सहकार्य असणे आवश्यक आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉटस् प्लस टीबी एचआयव्ही पर्यवेक्षक सी.बी.भुजाडे, कार्यक्रम समन्वयक धनेंद्र कटरे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक हरिष चिंधालोरे, समुपदेशक सुभाष कापडणे, संगणक चालक पंकज लुतडे, एच.एस.उईके, आरोग्य सहायक श्री.कुंभलकर यांनी परिश्रम घेतले.