मुख्य बातम्या:

दोन वर्षात राज्य शासनातील 72 हजार पदे भरणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई,दि.२८ः–राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षांत ७२ हजार पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना जाहीर केला. विधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, येत्या २ वर्षांत ७२ हजार पदे भरण्यात येणार आहेत त्यातील निम्मी पदे पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात भरली जातील.

कृषी विभागात २५००, पशुसंवर्धन १०४७, मत्स्यविकास ९०, ग्रामविकास ११ हजार, आरोग्य १० हजार ५६८, गृह ७१११, सार्वजनिक बांधकाम ८३३७, जलसंपदा ८२२७, जलसंधारण २४२३ नगरविकास १५०० अशी एकूण ३६ हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत.
पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत चौकशी समिती नेमण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला. या दाेन्ही मंत्र्यांसह कर्ज प्रकरणात काेट्यवधी रुपयांची नियमबाह्य सुट मिळवल्याचा अाराेप असलेले कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनाही मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ४ जुलैपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन नागपुरात घ्यावयाचे की मुंबईत, याबाबतचा अंतिम निर्णय मंगळवारी घेण्यात येईल.

 

शेतकऱ्यांना दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी ३१ मार्चची मुदत वाढवून देणार

दीड लाख रुपयांवरील कर्ज भरण्याची ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत वाढवण्यात येणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. विधिमंडळ अधिवेशनाच्या समाप्तीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत दीड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असेल तर वरचे पैसे भरल्यास शेतकऱ्याचे दीड लाख कर्ज सरकार भरणार आहे. दीड लाखावरील कर्ज भरण्यास ३१ मार्चपर्यंतची मुदत होती. परंतु तूर, ऊस आदींचे पैसे न मिळाल्याने शेतकरी ३१ मार्चपर्यंत पैसे भरू शकत नाहीत. याकरिता मुदत वाढवून देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Share