‘रिव्हर्स गिअर’वर भारतभ्रमणावर निघाले तरुण

0
25

साकोली,दि.२८ः- देशाचा एकही जवान सिमेवर शहीद होऊ नये, जम्मू काश्मिरचा प्रश्न मार्गी लागून दहशतवाद संपुष्टात यावा. याची जनजागृती व्हावी यासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील तरुण भारत भ्रमणावर निघाले आहेत. विशेष म्हणजे हे तरूण ‘रिव्हर्स कार’ चालवित आहेत. दरम्यान बेला – मुजबी मार्गे नागपूरकडे जाताना त्यांचे स्वागत करून त्यांना या उपक्रमाबद्दल विचारले असता त्यांनी  ही माहिती दिली.
संतोष चंद्रकांत राजेशिर्के असे त्या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा शिंदगवळी ता.भोर जि.पुणे येथील असून एका खासगी कंपनीत कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत आहे. मागील तीन महिन्यापासून देशातील २४ राज्यात त्यांनी भ्रमण केले आहे.
१० जानेवारी रोजी स्विफ्ट कारने संपूर्ण भारत भ्रमण ‘रिव्हर्स गियर’ने रिव्हर्स कार चालवित जात आहेत. रिव्हर्स कार चालविण्यामागील कारण विचारले असता काहीतरी नवीन करण्याची आवड असल्यामुळे हा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. रिव्हर्स कार चालविण्याचा कोणताही त्रास होऊ नये यासाठी एक दुचाकी बुलेटसुद्धा बरोबर घेतली आहे. त्याचा सहकारी अक्षय पवार हा दुचाकी चालवत सोबत येत आहे.
भारतीय जवानांना सिमेवर जावून मनोबल वाढविणे, पाकिस्तानच्या कैदेमध्ये असलेले कुलभूषण जाधव तसेच इतर भारतीय बंदींना भारत सरकारने सोडवून आणावे. भारतीयांनी विदेशी वस्तूचा त्याग करून स्वदेशीचा वापर करावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन ज्याठिकाणी जातो त्याठिकाणी स्वच्छ भारत अभियानाचे महत्त्व सांगत असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ९,७५० कि.मी. प्रवास झाला असून अजून ३,५०० कि.मी. चा प्रवास शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर, औरंगाबाद, सिंदखेड राजा येथे १२ जानेवारीला जिजाऊंना अभिवादन करून महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल सिलीगुडी मार्गे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, मणीपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, पुढे पश्चिम बंगाल मार्गे बिहारमार्गे झारखंड, ओडिसा, छत्तीसगडमार्गे भंडारा जिल्ह्यातून नागपूरकडे रिव्हर्स कार चालवित जात आहेत. नागपूरमार्गे तेलंगाणा, आंध्रप्रदेश, तामिलनाडू, केरळ, गोवा, कर्नाटक व पुन्हा महाराष्ट्रात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.