खरेदी विक्रीसमितीने केली शासकीय जागेची विक्री

0
11

अर्जुनी मोरगाव,दि.२८ः-स्थानिक खरेदी विक्री सहकारी संस्थेची गट क्रं.१८८ ची जमीन दर्शवून त्याऐवजी संस्था पदाधिाकार्‍यांनी शासकीय जमिनीच्या नियमबाह्य लिलाव करून भूखंड घोटाळा केल्याचा आरोप तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे यांनी केला आहे. याप्रकरणी तपास करून संबंधितांवर फौजदारी कारवाई व संस्था पदाधिकार्‍यांवर अपात्रतेची कारवाई करण्याची तक्रार जिल्हा निबंधकांकडे करण्यात आली आहे.
स्थानिक खरेदी विक्री संस्थेच्या मालकीची गट क्रं.१८८ आराजी 0.२४ हे.आर.जमिन आहे. या जागेच्या काही भागात व्यापारी गाळे व संस्थेचे गोदाम आहेत. संस्थेने अकृषक असलेली ९२२४ चौ.फुट जागा विकण्यासाठी वर्तमानपत्र व छापील पत्रकांद्वारे जाहिरात केली. या जमिन विक्रीला गोंदिया येथील जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांची परवानगी मिळाल्याचे दर्शविण्यात आले. मात्र या जागेचा लिलाव संस्थेच्या सभागृहात बसून जाहिर बोलीद्वारे करण्यात आला आहे.
वास्तविकतेन संस्थेची ही जमीन कोणत्याही सक्षम अधिकार्‍यांच्या आदेशान्वये अकृषक झालेली नाही. शिवाय संस्थेची ९२२४ चौ.फूट रिकामी जागा शिल्लक आहे किंवा नाही याची शहानिशा भूमी अभिलेख कार्यालया मार्फत करण्यात आली नाही. मग या जागेची विक्री करण्याची जिल्हा निबंधकांनी परवानगी दिलींचे कशी. असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर जमीन मोजणीसाठी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कापगते यांनी अर्ज दाखल केला असला तरी मोजणी झालेल्या अभिलेखावर त्यांनी स्वाक्षरी केली नाही. मौक्यावर संस्थेची जागा नाही. संस्थेने मोजणी अधिकार्‍याला इतरांची तसेच शासकीय पाटाची जागा दाखवून त्या जागेचा लिलाव केला आहे.
या जमिनीला लागूनच अध्यक्ष यांचा ले-आउट भूमापन क्रं.१८९ मध्ये कापगते कॉम्प्लेक्स हा लेआउट आहे. त्यांनी शासकीय पाट व ख.वि.समितीच्या काही भागावर अतिक्रमण करून ती जागा वेगवेगळ्या भूूखंडधारकांना विक्री केल्याचा आरोपी त्यांनी केला आहे.
संस्थेचे पदाधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी नाकाडे यांनी सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक व नगरपंचायत मुख्याधिकार्‍यांकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.