गोंडवाना विद्यापीठाचा दीक्षांत सभारंभ ३१ मार्चला, नितीन गडकरी मुख्य अतिथी

0
8

गडचिरोली,दि.२९: गोंडवाना विद्यापीठाचा ५ वा दीक्षांत समारंभ ३१ मार्चला सकाळी १०.३० वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून, मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.चंद्रशेखर भुसारी, प्रभारी कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले, परीक्षा नियंत्रक डॉ.ज.व्ही.दडवे उपस्थित होते.

डॉ.नामदेव कल्याणकर यांनी सांगितले की, दीक्षांत भाषणातून शैक्षणिक संस्थांना पुढील कार्यक्रमांसाठी दिशा मिळत असते. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे दीक्षांत भाषण देणार आहेत. श्री.गडकरी यांच्या भाषणातून भविष्यकालीन सामाजिक व शैक्षणिक घडामोडीविषयींच्या सूचना मिळतील, असा विश्वास डॉ.कल्याणकर यांनी व्यक्त केला. या समारंभात हिवाळी २०१६ व उन्हाळी २०१७ च्या परिक्षेतील १५५९९ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येतील. तसेच २८७ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांपैकी प्रथम असणाऱ्या ७७ विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल. शिवाय २९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवीने, तर २१ विद्यार्थ्यांना २८ सुवर्णपदके देऊन सन्मानित केले जाईल. सुवर्णपदकांसाठी जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी विद्यापीठाला मदत करावी, असे आवाहन डॉ.कल्याणकर यांनी यावेळी केले.

विद्यापीठासाठी २०० एकर जमीन हस्तांतरीत करण्याचा विषय अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी शासनाने ८९ कोटी रुपये दिले आहेत. विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करण्याविषयीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असला, तरी आधीच विविध २२ विभागांचे प्रस्ताव शासनाकडे २ वर्षांपासून प्रलंबित असल्याची माहिती डॉ.कल्याणकर यांनी दिली. विद्यापीठाच्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी राजकीय व्यक्तींशिवाय सर्वांनीच पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.कल्याणकर म्हणाले.