इटियाडोह पाटबंधारे उपविभागाच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करा

0
24
अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.29 : बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया अंतर्गत इटियाडोह पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग अर्जुनी मोरगाव येथील अनागोंदी कारभाराची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी इटियाडोह धरण संवर्धन व संरक्षण समितीचे श्रीधर हटवार यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर यांचेकडे केली आहे.
प्राप्त माहितीनुसार शेतकºयांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकार करणारे गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह हे मोठे धरण आहे. या धरणाच्या सिंचनामुळे गोंदिया, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यातील शेती व शेतकरी समृद्ध झाले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अधिकाºयांच्या निष्काळजी व अनागोंदी कारभारामुळे शेतकरी वर्ग कमालीचा त्रस्त आहे. धरणाच्या पाळीवर कोणतीही मोठी झाडे नसावी व त्या झाडांच्या मुळांमुळे जागा पोखरून धरणाचे पाणी झिरपू शकते व हळुहळु धरण फुटण्याची भिती वा शक्यता असते. मात्र, इटियाडोह धरणाच्या पाळीवर सुमारे २० ते २५ फूट उंचीची झाडे होती. या संबंधाने इटियाडोह धरण संवर्धन व संरक्षण समितीने नाशिकच्या धरण सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन मार्गदर्शन मागविले होते. मात्र, त्यांनी मार्गदर्शन केले नाही. या उलट पावसाळा पूर्व २०१४ ते पावसाळा उत्तर २०१७ चे निरीक्षण अहवाल तपासणी केला असता अहवालात धरणाच्या पाळीवर झाडे वाढलेली नसल्याचे निदर्शनास आल्याचे समितीला कळविण्यात आले. सध्या येथील धरणाच्या पाळीवरील झाडे तोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, पत्राचा परामर्श विचारात घेतला तर झाडेच नसताना झाडे कापण्याचे काम कसे काय सुरू आहे. यावर साधारणता ७५ ते ८५ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. दरम्यानच्या काळात जर पाळ फुटण्याची दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण असते.
आमची तरुण युवकांची इटियाडोह धरण संवर्धन व संरक्षण समिती आहे. समितीने लोकसहभागातून विभागाचा कोणताही खर्च न करता मोफत झाडे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी गोठणगावचे शाखा अभियंता डाखोरे यांनी अटकाव केला होता. या धरण परिसरात श्रमदानातून विकास करण्याचा इटियाडोह संवर्धन व संरक्षण समितीचा संकल्प आहे. मात्र, येथील अधिकारी वर्गाची मुळीच सहकार्याची भावना नाही, असे समितीचे म्हणणे आहे.
या धरणाच्या झाँशीनगर बुडीत क्षेत्रात परप्रांतीय बंगाली इसमांनी सुमारे शंभर एकर जागेत विभागाची कुठलीही परवानगी न घेता टरबूज लागवड डिसेंबर २०१७ या महिन्यात केली. मात्र, या विभागाच्या अधिकाºयांना याबाबत कुठलीच माहिती नाही. पत्रकार तिथे पोहोचले, त्यांनी उपविभागीय अभियंता डी.बी. भिवगडे यांना या संदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांना कळले. यावरून विभागातील कर्मचाºयांची कर्तव्यदक्षता कळते, हे परप्रांतीय बंगाली व्यवसायीक याच धरणाच्या पाण्याचा टरबूज पिकासाठी सर्रास वापर करीत आहेत. वर्तमान पत्रात बातमी आल्यानंतर पंचनामा व कारवाहीला सुरुवात झाली. या बुडीत क्षेत्रात या व्यवसायीकांचे ट्रक जाण्यासाठी रस्तेसुद्धा तयार करण्यात आले आहेत. तरी या प्रकरणाची सखोल व योग्य चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी इटियाडोह संवर्धन व संरक्षण समितीचे श्रीधर हटवार यांनी वरिष्ठांकडे केली आहे.