राज्यातील ११00 पोलिस ठाण्यांमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

0
14

भंडारा,दि.30ः-पोलिस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. यासाठी ७२ कोटी ६0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून या आदेशाची अंमलबजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.
राज्यातील पोलिस ठाण्यांमध्ये वाढत जाणार्‍या कोठडीतील मृत्यू (कस्टोडियल डेथ) रोखण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही वर्षांपूर्वी दिले होते. त्यानुसार, सन २0१५ मध्ये पोलीस महासंचालकांनी सीसीटीव्ही यंत्रणेसाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता. सदर प्रस्ताव विचारात घेऊन उच्चस्तरीय शक्ती प्रदत्त समितीच्या २७ फेब्रुवारी २0१८ च्या बैठकीत न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील ११00 पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी ७२ कोटी ६0 लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयाची अंमलबजावणी दोन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने स्मार्ट पोलीस ठाणे म्हणून निवड केलेल्या राज्यातील ५00 पोलीस ठाण्यांमध्ये कॅमेरे बसविण्यात येणार असून दुसर्‍या टप्प्यात उर्वरित पोलिस ठाण्यांमध्ये कॅमेरे लावण्यात येणार आहेत. हे कॅमेरे पोलीस ठाण्याचे प्रवेशद्वार, बाहेर निघण्याचे द्वार, पॅसेज, अधिकार्‍यांचे कक्ष, लॉकअप याशिवाय आणखी काही कक्ष असतील, त्याठिकाणी लावले जातील. पोलीस ठाण्यांचा आकार पाहून कॅमेरांची संख्या निर्धारीत होणार आहे. एकंदरीत संपूर्ण पोलिस ठाणे सीसीटीव्हीच्या कक्षेत येणार असून बारीकसारीक हालचालींवर लक्ष राहणार आहे.