लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामाप्रमाणे-नाना पटोले

0
10

सडक अर्जुनी,दि.30ः ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्रीराम हे महान होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हनुमान घडले. श्रीरामामुळेच हनुमान मोठे झाले. त्यामुळे रामायणामध्ये ज्याप्रमाणे रामाला कोणताही त्रास हनुमानाने होऊ दिला नाही. त्याच हनुमानाच्या भूमिकेत आजचा लोकप्रतिनिधी हा आपल्या जनता जनार्दन म्हणून प्रभू श्रीरामाविषयी समर्पित असणे तेवढेच महत्वाचे आहे. अन्यथा त्याला हनुमानाच्या भूमिकेत राहण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामाप्रमाणे आहे, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी केले. ते सडक-अर्जुनी तालुक्यातील बकी (मेंडकी) येथे त्यांच्याच खासदार निधीतून तयार करण्यात आलेल्या सभा मंडपाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
पटोले म्हणाले, जनतेमुळे लोकप्रतिनिधी मोठमोठे पद उपभोगतात. पण जेव्हा जनतेच्या समस्या सोडविण्याचा विषय येतो तेव्हा नेता आपल्या खुर्चीच्या मोहापायी जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देतात. अशा लोकप्रतिनिधींना जनतेने येणाऱ्या काळात धडा शिकविणे तितकेच महत्वाचे असल्याचे सांगत जनतेने नेहमी जागृत राहण्याचे आवाहन केले.
या वेळी हनुमान मंदिराच्या प्रांगणात संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रामुख्याने भंडारा जिल्हा को-आॅपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जागेश्वर धनभाते, उपाध्यक्ष ईश्वर कोरे, माजी सभापती राजेश नंदागवळी, युवक काँग्रेसचे महासचिव निशांत राऊत, डॉ. बबन कांबळे, चिखलीचे सरपंच सुधाकर कुर्वे, पद्माकर नेवारे, रेशमा मोटघरे, धर्मादास शहारे, इशन शिवणकर, समितीचे अध्यक्ष ग्यानीराम मारवाडे, उपाध्यक्ष रामदास बागडे व समितीचे सदस्य उपस्थित होते. कथा व प्रवचन हभप कविता उपरीकर महाराज नागपूर यांच्या वाणीतून सादर झाली.