लोकबिरादरीला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची भेट

0
18

आल्लापली,दि.३०: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील तालुका म्हणून भामरागड तालुक्याची ओळख आहे. येथे नक्षल्यांशी लढणाऱ्या पोलिसांचे कौतुक करण्यासाठी आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देण्यावाचून राहवले नाही. ते आले आणि येथील चिमुकल्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये बराच वेळपर्यंत रममाण झाले. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यानंतर पत्रकारांशी बोलतांना ग्रृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, “श्रद्धेय बाबा आमटे यांची समाजसेवेची प्रेरणा घेत डॉक्टर प्रकाश आमटे सौ.मंदाकिनी आमटे यांनी भामरागडच्या निबिढ अरण्यात या ठिकाणी ४६ वर्षांपूर्वी लोकबिरादरी प्रकल्प या नावाने समाजसेवेची बीजे रोवली; त्याचा विस्तार आता बराच झाला आहे.

भामरागड तालुका नक्षलग्रस्त आहे, हे सर्वश्रुत आहे. आदिवासीबहुल हा तालुका दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. कधी आदिवासींवरील अत्याचार, तर कधी नक्षल्यांच्या कारवाया हे चर्चेचे कारण असते. याच तालुका मुख्यालयी काल(दि.२९)देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहीर केंद्रीय राखीव दलातर्फे आयोजित एका कार्यक्रमासाठी आले होते. आल्याआल्याच त्यांनी पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली. यावेळी डॉ. प्रकाश आमटे, डॉ.मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समिक्षा आमटे यांच्याशी श्री.अहीर यांनी सविस्तर चर्चा केली. डॉ. प्रकाश आमटे यांनी हंसराज अहीर व खा. अशोक नेते यांना लोकबिरादरी प्रकल्पातील विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी प्राणी अनाथालय, सौर ऊर्जा वापर प्रकल्प, आदिवासी विद्यार्थ्यांसाठीचे संगणक कक्ष, सुसज्ज वसतिग्रुह, लोकबिरादरी आश्रमशाळेंतर्गत विद्यार्थ्यांसाठीचे विविध उपक्रम, गोटुल, आश्रमशाळा, लोकबिरादरी हॉस्पिटल आदींची हंसराज अहीर यांनी पाहणी केली.