गोंदिया-बालाघाट-समनापूर रेल्वेला रेल्वेराज्यमंत्री दाखविणार झेंडी

0
28

गोंदिया,दि.31 : जबलपूर रेल्वे लाईन अंतर्गत गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन रविवारी (दि.१) एप्रिलपासून लोहमार्गावर धावणार आहे. या गाडीला बालाघाट रेल्वे स्थानकातून रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार आहेत.यावेळी बालाघाटचे खासदार मधू भगत,कृषी मंत्री गौरीशंकर बिसेनसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
गोंदिया ते जबलपूरपर्यंतच्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे काम बालाघाट ते समनापूरपर्यंत पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. बालाघाट येथे आयोजित कार्यक्रमात रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा सायंकाळी ४.४० वाजता हिरवी झेंडी दाखवून ट्रेनला रवाना करतील. याप्रसंगी प्रामुख्याने दपूम रेल्वेचे जीएम सुनील सोईन, डीआरएम अमित अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येने राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे गोंदिया ते बालाघाट रेल्वे लाईनचे काम आधीच पूर्ण झाले आहे. त्यावर सध्या गोंदिया-बालाघाट रेल्वेगाड्या सुरू आहेत. परंतु आता समनापूरपर्यंत रेल्वे लाईन सुरू होणे व समनापूर ते नैनपूरपर्यंतचे केवळ ६० किमी अंतराचे काम शिल्लक आहे. नैनपूर ते जबलपूरपर्यंतच्या लाईनचे ब्रॉडगेजचे काम पूर्ण झाल्यावर या वर्षाच्या शेवटी गोंदिया ते जबलपूरपर्यंत रेल्वे सेवेचा लाभ या क्षेत्रातील प्रवाशांना मिळणार आहे.
जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन कोचचा विस्तार
प्रवासी गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेवून रेल्वे प्रशासनाने गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन अतिरिक्त बोगी अस्थायी स्वरूपात ३० मार्च २०१८ पर्यंतच लावल्या होत्या. आता याचा विस्तार ३० जून २०१८ पर्यंत करण्यात आला आहे. या सुविधेचा लाभ रेल्वे प्रवाशांना कंफर्म सीटच्या रूपात मिळू शकेल. गाडी (१२०७०/१२०६९) गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये दोन सामान्य चेयरकार अनुक्रमे गोंदियावरून २९ जून २०१८ पर्यंत व रायगडवरून ३० जून २०१८ पर्यंत विस्तार करण्यात आले आहे.