कर्जमाफीच्या अर्जाची मुदत 14 एप्रिलपर्यंत;दोन महिन्यात 435 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

0
18

मुंबई,दि.31 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 पर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. जून महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती.  कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात राज्यामध्ये एकुण 435 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी याकाळात एकुण 414 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. एकंदरीतच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला आहे.

अर्ज भरण्याची सेवा महाईसेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम केंद्रावरून नि:शुल्क पुरविण्याबाबत त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वत:सुद्धा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून यूजर आयडी व पासवर्डच्या आधारे अर्ज सादर करता येईल. उपरोक्त कालावधीत आपले सरकार सेवा केंद्र, सर्व महा-ई-सेवा केंद्र, ग्राहक सेवा केंद्र व ई-संग्राम यांनी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज नि:शुल्क भरून देण्यात येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नाव ग्रीन यादीमध्ये आले नाही, मिसमॅच डाटामध्ये नाही, तसेच ज्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, अशा शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.