लातूरच्या विकासाचा नवा पॅटर्न तयार करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
15

लातूर,दि.01 :- लातूरच्या परीक्षेचा पॅटर्न देशभर प्रसिध्द आहे. हा पॅटर्न तुम्ही तयार केला आता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लातूरचा विकासाचा पॅटर्न तयार करुन लातूरचे नाव देशाच्याच नव्हे तर जगाच्या नकाशावर झळकावणार. रेल्वेच्या या मेट्रो रेल्वे कोच फॅक्टरीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून काही हजार हाताना काम मिळणार आहे. युवकांचे स्थलांतर थांबणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारला येथे केले.
लातूर शहराजवळील हरंगूळ येथील रेल्वेतर्फे उभारण्यात येणाऱ्या महत्वकांक्षी मेट्रो रेल कोच फॅक्टरीच्या भूमिपूजन समारंभानंतर शहरातील क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे तथा कोळसा मंत्री पियुष गोयल, राज्याच्या महिला व बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे कामगार, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, लातूर शहराचे महापौर सुरेश पवार, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार सर्वश्री. सुधाकर भालेराव, सुरजितसिंह ठाकूर, विनायकराव पाटील, अमित देशमुख, त्र्यंबकराव भिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलींद लातूरे, दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्र शर्मा, सोलापूर रेल्वेचे डीआरएम हितेंद्र मल्होत्रा, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर, पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, अभिमन्यू पवार, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
लातूरच्या भूमीला विकासाची भूक व तहान आहे. रेल्वेमंत्री गोयल, पालकमंत्री श्री. निलंगेकर, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नातून रेल्वेचा हा प्रकल्प लातूर येथे आणण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की , अवघ्या दोन महिन्यात सर्व प्रक्रिया पूर्ण करुन या प्रकल्पाचे भूमिपूजन येथे होत आहे. 31 जानेवारी, 2018 रोजी रेल्वे प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्यानंतर लातूरच्या या सर्व नेत्यांनी हा प्रकल्प लातूर येथेच उभारण्यात यावा यासाठी माझ्यामागे सातत्याने मागणीचा पाठपुरावा केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मेट्रोची लाईन टाकण्याचे काम सुरु आहे. मेट्रोचे मार्ग तयार होत आहेत. परंतु सध्या या मार्गावरुन धावणाऱ्या मेट्रो रेल्वेला विदेशात तयार होणाऱ्या डब्यांचा वापर करावा लागतो. विदेशातील रेल्वे डब्याऐवजी महाराष्ट्रातच मेट्रोचे डब्बे तयार केले तर येथील तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच विकासाला गती मिळणार असून परकीय चलनही वाचणार आहे, असेही ते म्हणाले.
या प्रकल्पामुळे लातूरसह मराठवाड्याच्या विकासाला गती मिळणार आहे. लातूरच्या नेत्यांच्या आग्रहामुळे रेल्वेमंत्री गोयल यांनी एकही मिनिटाचा विलंब न लावता लातूरमध्ये हा प्रकल्प आणण्यास मान्यता दिली. हा प्रकल्प जर लातूरला हवा असेल तर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काही अटी व मागण्या समोर केल्या. त्या सर्व मागण्या मान्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जमीन उपलब्ध असल्याने पहिल्या टप्प्याचे काम तातडीने सुरु करण्याच्या अनुषंगाने मॅग्नेटीक महाराष्ट्राच्या कार्यक्रमात फेब्रुवारीमध्ये रेल्वे मंत्रालयाशी एमएयू (करार) केला . या प्रकल्पात एक ते दीड वर्षात कोचच्या निर्मितीचे काम सुरु होईल, असा विश्वास रेल्वेमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्रातील सरकार किती गतीने काम करतेय हे यातून स्पष्ट होते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, वर्षभरात याच क्रीडा संकुलावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये कार्यपूर्तीचा या पेक्षा भव्य कार्यक्रम आयोजित केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रस्ते हे विकासाचे महामार्ग असतात हे ध्यानात घेऊन राज्यात समृध्दी महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. वेगवेगळ्या मार्गाने बंदरांपर्यंत माल पोहोचविण्याचे काम जेवढ्या लवकर होईल तेवढा त्या भागाचा विकास होतो. मराठवाडा-विदर्भापासून समुद्र दूर असल्याने जलदगती महामार्गांच्या माध्यमातून हे आंतर कमी करता येऊ शकते. राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून पुणे, मुंबईसह बंदरापर्यंत पाच-सहा तासात पोहोचता येईल, असा समृध्दी महामार्ग येत्या दोन वर्षात पूर्ण करण्याचा राज्य शासनाने संकल्प केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती होऊन उद्योजकांना पुणे-मुंबईस जाण्याची गरज पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले .
लातूर येथील रेल्वे प्रकल्पांमुळे नवा महाराष्ट्र घडणार आहे. हा प्रकल्प म्हणजे लातूरच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरु शकतो. पालकमंत्री, खासदार, अभिमन्यू पवार यांनी खूप मोठा पाठपुरावा केला. त्यामुळे हा प्रकल्प लातूरला येऊ शकला. आरजेएमएल या बोगी निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सतीश अग्नीहोत्री यांनीही सहमती देऊन या कामी महत्वाचे योगदान दिले आहे, असे सांगून श्री. गोयल म्हणाले की, 70 वर्षात प्रथमच एवढा मोठा प्रकल्प मराठवाड्यात होऊ घातला आहे, ही महत्वाची बाब आहे. या प्रकल्पामुळे लातूर शहराला औद्योगिक शहर म्हणून ओळख मिळेल. सध्या मेट्रोसाठी विदेशातील कोच वापरले जातात. यापुढे लातूरमध्ये बनणारे कोच संबंध देशात जातील. ही बाब जितकी महत्वाची आहे. त्याबरोबरच छोटे, लघु आणि मध्यम प्रकल्प हे या प्रकल्पामुळे सुरु होतील. त्यामुळे उद्योग तयार होऊन वेगवेगळ्या संधी निर्माण होतील. प्रधानमंत्र्यांच्या वंचित प्रदेशाच्या विकासाच्या संकल्पनेला या प्रकल्पामुळे हातभार लागणार आहे. इतर प्रदेशासाठी लातूरमधील हा प्रकल्प प्रेरणादायी ठरणार आहे. या बरोबरच इतर सेवांचे जाळे निर्माण होऊन रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. डॉक्टर-इंजिनिअर बनविणारे शहर आता उद्योजकीय शहर होणार आहे, असे ते म्हणाले.
या प्रकल्पामुळे आगळा-वेगळा पॅटर्न तयार होणार आहे. जिल्ह्यातील जनतेचे भविष्य घडविले जाणार आहे. विकासाची नवी गुढी उभारली जात आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह मराठवाड्याचे भवितव्य घडणार आहे, असे सांगून खासदार गायकवाड यांनी प्रधानमंत्री व रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी. के. शर्मा यांनी केले. शैलेश गोजमगुंडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डीआरएम हितेंद्र मल्होत्रा यांनी मानले .