दलित संघटना-करनी सेना आपसात भिडल्या, राजस्थानमध्ये वाहनांची जाळपोळ

0
11

नवी दिल्ली,दि.02(वृत्तसंस्था)– एससी-एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (अॅट्रॉसिटी अॅक्ट) तत्काळ अटक करता येणार नाही या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध दलित संघटनांनी सोमवारी ‘भारतबंद’चे आवाहन केले आहे. अॅट्रॉसिटी अॅक्ट संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने आज पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. रवीशंकर प्रसाद यांनी याबद्दलची माहिती दिली. दुसरीकडे, राजस्थानमध्ये करनी सेना आणि दलित संघटना यांच्यात झडप उडाली. येथे पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पंजाबमध्ये बंदमुळे आज होणाऱ्या सीबीएसईच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, तर महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये बंदला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये बंदचा कोणताही परिणाम दिसला नाही. उत्तर भारतातील पाच राज्यांमध्ये बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

राजस्थान : भारतबंद आंदोलनादरम्यान बाडमेर येथे दलित संघटना आणि करणी सेना यांच्यात चकमक झाली. यात 25 जण जखमी झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. करणी सेना बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली होती, त्याला दलित संघटनांनीविरोध केला होता. दुसरीकडे, भरतपूर येथे महिला हातात लाठ्या-काठ्या घेऊन आंदोलनात उतरल्या आहेत.
पंजाब: शाळा-कॉलेज, बस आणि इंटरनेट सेवा बंद आहे. सीबीएसईने 10वी आणि 12वीच्या परीक्षा पुढे ढकलेल्या आहेत.
ओडिशा : रेलरोको सुरु आहे.
बिहार : आरा, भागलपुर, फोरबिसगंज येथे रेलरोको आंदोलन करण्यात आले. येथे डाव्या पक्ष-संघटनांनीही बंदला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र : राजधानी मुंबईमध्ये बंदचा कुठलाही परिणाम दिसलेला नाही. सकाळपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. नंदुरबारमध्ये बंदला हिंसक वळण लागले आहे.गोंदिया जिल्ह्यातील करटी येथे टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली.