भारताची वाटचाल सीरियाच्या दिशेने- आंबेडकर

0
11

पुणे,दि.02(विशेष प्रतिनिधी)- देशाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. या देशाला आता कोणी एक नेता राहिलेला नाही. संपूर्ण समाज जाती-जातीत विभागले गेला आहे. त्यामुळे आपल्या देशाची अवस्था आता सीरियाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपींना तत्काळ अटक करता येणार नाही असा निर्णय मागील महिन्यात सुप्रीम कोर्टाने दिला होता. यानंतर देशभरातील दलित संघटना आक्रमक झाला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज ( 2 एप्रिल) दलित संघटनांनी भारतबंदचे आवाहन केले आहे. त्याचे पडसाद देशभर पडले आहेत. मध्यप्रदेशात या आंदोलनादरम्यान तीन दलितांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात तत्काळ पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत टीका केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज जे काही देशात घडतेय त्याला केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट हे सर्वस्वी जबाबदार आहेत. आजच्या भारत बंदच्या आंदोलनाबाबत गेल्या दहा दिवसापासून सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल होत होते. सोशल मिडियावर आजच्या भारत बंदचे आवाहन कोणी केले याची कोणालाही माहित नाही. मग सरकार नावाची यंत्रणा काय करत आहे. त्यामुळे आज झालेल्या हिंसाचाराला केंद्र सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार आहेत. आज समाजात काहीही घडले तरी सरकार दुर्लक्ष करते किंवा त्यांना माहित नसते. त्यामुळे आपल्या देशाची स्थिती हळूहळू सीरियासारखी वाटचाल सुरू झाली आहे. आज देशाला कोणी राहिला राहिलेला नाही. सर्व समाज जाती- जातीत विभागला गेला आहे. देशात, राज्याराज्यात अशा वेगवेगळ्या घटना घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत का बसतात, त्यांनी पुढे येऊन आपले म्हणणे समाजापुढे मांडले पाहिजे असे मतही आंबेडकर यांनी मांडले.