दारूबंदीसाठी महिलेने बाटल्यांमध्ये घेतले ‘गाडून’

0
12

यवतमाळ,दि.04-वर्धा, चंद्रपूर, गडचिराेलीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातही दारूबंदी करावी, या मागणीसाठी महिलांच्या अनेक संघटना सरसावल्या अाहेत. साेमवारी स्वामिनी दारूमुक्ती संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वेळी एका महिलेने स्वत:ला चक्क दारूच्या बाटल्यांमध्ये गाडून घेण्याचे प्रतीकात्मक अांदाेलन करत दारूमुक्तीची मागणी केली. या आंदोलनात शेकडो महिला सहभागी झाल्या हाेत्या.

‘स्वामिनी’चे मुख्य संयोजक महेश पवार यांनी अांदाेलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले, जिल्हा व्यसनमुक्त करायचा असेल तर पहिल्यांदा परवानाधारक दारू दुकान बंद व्हायला पाहिजे. आज जिल्ह्यातील गावगावात दारू हेच पुरवत आहे. त्याचबरोबर दारूबंदीचे कायदे कडक झाले पाहिजेत. दारूला प्रतिष्ठा मिळवू नको, यासाठी दारूविरोधी प्रचार, प्रसारावर सरकारने भर द्यावा, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार आणि समुपदेशन असावे, तरच समाज व्यसनमुक्त होईल. मात्र, हा उपक्रम राबवायचा साेडून सरकारचा दारू व्यवसायाला प्राेत्साहन देत अाहे, असा अाराेप त्यांनी केला. या आंदोलनाप्रसंगी काही महिलांनी दारूमुळे अापले संसार कसे उघड्यावर अाले याच्या करुणा कहाण्या मांडल्या. महिलांवरील अत्याचार, खून, बलात्कार, अपघात, गुन्हेगारी या सर्व प्रकरणांत दारू महत्त्वाची भूमिका बजावते. मग या दारूपासून मिळणाऱ्या महसुलाचा हव्यास तरी सरकारने कशाला करावा? असा संतप्त सवाल महिलांनी केला. मागील वर्षी २० डिसेंबर राेजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या संघटनेच्या महिलांनी यवतमाळमध्ये दारूबंदीची मागणी केली हाेती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे अाश्वासन दिले हाेते. मात्र, अजून त्यांचा विचार सुरूच अाहे. सरकार महिलांना कधी न्याय मिळवून देणार? असा प्रश्नही महिला अांदाेलकांनी केला.या वेळी अमित सरोदे, सागर पुरी, योगेश राठोड, रूपेश वानखडे, विनायकराव बोदडे, वंदना राऊत यांनी आपले विचार मांडले. या आंदोलनात माला ठाकरे, अरुण बावणे, प्रवीण राहिले, दिनकर चौधरी, मंगेश मानकर अादींची उपस्थिती हाेती.