रायगड येथे माविमची राज्यस्तरीय आढावा बैठक माविम गोंदिया उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यात प्रथम

0
10

गोंदिया,दि.४: महिला आर्थिक विकास महामंडळाची सन २०१७-१८ या वर्षातील राज्यस्तरीय आढावा बैठक २४ व २५ मार्च रोजी हॉटेल रेडिसन ब्लू, अलिबाग जि.रायगड येथे संपन्न झाली. या कार्यशाळेचे उदघाटन रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. यावेळी माविमच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंद्रा मालो जैन, माविमच्या महाव्यवस्थापक कुसूम बाळसराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन २०१७-१८ या वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक योजनांच्या व उपक्रमांच्या प्रगतीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. माविम मुख्यालय यांच्याकडून उत्कृष्ट कार्य केलेल्या जिल्ह्याला सन २०१७-१८ या वर्षाकरीता पारितोषिक वितरीत करण्यात आले. यामध्ये महिला सक्षमीकरण, उद्योजकता, उपजिविका विकास इत्यादी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार माविम जिल्हा कार्यालय गोंदिया यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या उत्कृष्ट कामगीरीमध्ये जिल्ह्यातील बचतगटातील सर्व महिला, सहयोगीनी, लेखापाल, व्यवस्थापक, लोकसंचालित साधन केंद्र अध्यक्षा व कार्यकारीणी, जिल्ह्यातील सर्व माविम अधिकारी व कर्मचारी, जिल्हास्तरीय सर्व संबंधित कार्यालय, विभागीय सनियंत्रण व मुल्यांकन अधिकारी तसेच मुख्यालयातील वरिष्ठांचे योगदान आहे.
हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते माविम गोंदियाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहायक नियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे व उपजिविका सल्लागार सुनिल पंचभाई यांनी स्विकारला. यावेळी बचतगटांच्या यशोगाथांवर आधारीत पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.