‘एक जागा, एक उमेदवार’

0
11

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.05ः-‘एक जागा, एक उमेदवार’ या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीदरम्यान उमेदवारांना एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्यात यावी. वकील अश्‍विनी उपाध्याय यांनी याच संदर्भात कोर्टात दाखल केलेल्या याचिकेनंतर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. उपाध्याय यांनीही दोन जागांवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.
दरम्यान, उमेदवारांना एकापेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवण्यास प्रतिबंध करण्यात यावा, या मागणीसह आयोगाने हे देखील म्हटले आहे की, एका उमेदवाराने दोन जागांवरून लढल्याने केवळ सरकारी तिजोरीवरच अनावश्यक ताण येत नाही तर विजेत्या उमेदवारांच्या मतदारांसोबतही अन्याय होतो. त्याचबरोबर दोन्ही जागांवर जर उमेदवार निवडून आला तर त्याने सोडलेल्या जागेवर होणार्‍या पोटनिवडणुकीचा संपूर्ण खर्च संबंधित उमेदवाराकडून वसूल करण्यात यावा. सुप्रीम कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली असून याप्रकरणी सहा आठवड्यांत सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.