पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविकेला पकडले

0
9

धुळे, दि.५ : प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत तिसरा हप्ता देण्यासाठी झिरणीपाडा येथील लाभार्थीकडून पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेविका गीता बैरागी यांना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास  पंचायत समितीच्या आवारात रंगेहात पकडण्यात आले. कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तालुक्यातील झिरणीपाडा येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मंजूर  झालेल्या घरकुलाचे पहिले दोन हप्ते मिळाल्यानंतर शासनाकडून आलेला तिसरा हप्ता देण्यासाठी ग्रामसेविका गीता बैरागी यांनी   लाभार्थीकडून पाच हजाराची लाच मागितली.
तेव्हा लाभार्थीने यासंदर्भात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार   गुरुवारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या पथकाने पंचायत समिती आवारात सापळा रचला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास  पंचायत समितीच्या आवारातच ५ हजाराची लाच घेतांना ग्रामसेविका गीता बैरागी यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यासंदर्भात साक्री पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.