भाजपच्या शक्तीप्रदर्शनाला नाराजीची किनार: गोपीनाथ मुंडेंच्या फोटोचा विसर

0
5

मुंबई,दि.06(वृत्तसंस्था)- भाजपच्या 38 व्या स्थापना दिनाच्या निमित्ताने पक्षाकडून मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मात्र, भाजपच्या या शक्तीप्रदर्शानला नाराजीचे गालबोट लागले. भाजपच्या महामेळाव्याच्या बॅनरवर भाजपचे दिग्गज नेते राहिलेल्या गोपीनाथ मुंडे किंवा प्रमोद महाजन या दिवंगत नेत्यांचे फोटो टाकले नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील खासकरून बीडमधून आलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी बीकेसीत सभास्थळी गोंधळ घातला.

‘गोपीनाथ मुंडे अमर रहें’च्या घोषणा देत भाजपमधील नेत्यांना या घटनेची दखल घ्यायला लागली. तसेच मुंडेंवर प्रेम करणा-या कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे, पंकजा व प्रीतम मुंडेंचे फोटो असलेले बॅनर फडकावले. यानंतरही कार्यकर्ते वारंवार घोषणा देत कार्यक्रमात व्यत्यय आणत होते. अखेर पंकजा मुंडे यांनी लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले. यानंतर कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या घोषणा दिल्या व शांत झाले. दरम्यान, महाराष्ट्रात तळागाळात भाजपला नेणा-या गोपीनाथ मुंडे यांचा भाजप नेतृत्त्वाला इतक्या लवकर विसर पडला काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.