सलमानला जोरदार झटका, आजची रात्रही तुरुंगात

0
10

जोधपूर(वृत्तसंस्था)दि.06 – काळवीट शिकार प्रकरणी गुरुवारी दोषी ठरलेल्या सलमान खानला शुक्रवारी सेशन्स कोर्टाकडून दिलासा मिळाला नाही. यामुळे सलमानचा तुरुंगातील मुक्काम एका दिवसाने वाढला आहे. सेशन्स कोर्टात शुक्रवारी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु झाली. जज रवींद्रकुमार जोशी यांनी म्हटले आहे, की रेकॉर्ड पाहिल्यानंतर उद्या सुनावणी केली जाईल. सलमानच्या वकीलांनी 51 पानांचा जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये 54 मुद्द्यांवर त्याला जामीन मंजूर करण्याची विनंती करण्यात आली होती. उद्या यावर सुनावणी होणार आहे. यामुळे तूर्तास आजची रात्र सलमानला तुरुंगातच राहावे लागणार आहे. सेशन्स कोर्टाने जामीन नामंजूर केला तर सलमानला हायकोर्टात अपील अर्ज करावा लागेल. आठवड्याचे शेवटचे दिवस असल्याने त्याला पुढील दोन दिवस तरी तुरुंगातच काढावे लागतील अशी शक्यता व्यक्त होत आहे. काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानशिवाय सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्र, नीलम या सेलेब्ससह दुष्यंत सिंह सहआरोपी होते. सीजेएम कोर्टाने संशयाचा फायदा देत त्यांची निर्दोष सुटका केली.

20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी गुरुवारी जोधपूर मुख्य न्यायदंडाधिकारी (सीजेएम) यांनी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवले. त्याला 5 वर्षांची कैद आणि 10 हजार रुपये दंड सुनावला. त्यानंतर त्याची रवानगी जोधपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यामुळे सलमानला ट्रायल कोर्टाकडून जामीन मिळाला नाही. त्याच्या वकीलांनी सत्र न्यायालयात (सेशन्स कोर्ट) जामीनासाठी अर्ज केला, मात्र सेशन्स कोर्टाने हातोहात सुनावणी करण्यास नकार दिला होता. शुक्रवारी सकाळीच सलमानची बहीण अलवीरा आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा सेशन्स कोर्टात पोहोचले होते.