राज्यातील १५ जिल्ह्यांत १,२१४ आरोग्य उपकेंद्र

0
14

मुंबई,दि..06 – ग्रामीण भागातील लोकांमध्ये कर्करोग किंवा क्षयरोग याबाबत जागरूकतेचा अभाव असतो. त्यामुळे आजाराचे पटकन निदान न झाल्याने आजार बळावतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर आरोग्य उपकेंद्र सुरू करण्यात आली आहेत. आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील आणखी १५ जिल्ह्यात एकूण १,२१४ नवीन उपकेंद्र सुरू करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारला लेखी प्रस्ताव पाठवला आहे.

खेडय़ापाडय़ात उच्च रक्तदाब, क्षयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांच्या रुग्णांचे वेळीच निदान आणि उपचार व्हावेत यासाठी राज्य सरकारने एप्रिल २०१७ मध्ये Health Wellness Centre सुरू केली आहेत. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अशी ३० आरोग्य उपकेंद्र सुरू आहेत. तर आता राज्य सरकारने महाराष्ट्रातील आणखी १५ जिल्ह्यात एकूण १,२१४ नवीन उपकेंद्र सुरू करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारला लेखी प्रस्ताव पाठवला आहे.

आरोग्य भवनातील एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार,२०१७-१८ या वर्षात ३०० उपकेंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मान्य झाला त्यानुसार त्याचे काम पूर्ण होईल. तर आता २०१८-१९ या वर्षात आणखी १,२१४ नवीन उपकेंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशन कार्यक्रमाचे सहाय्यक संचालक व आयुष प्रोग्राम प्रमुख डॉ. उमेश तागडे यांनी सांगितले की, आजार बळावण्यापूर्वीच त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हास्तरावर उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक उपकेंद्रावर एक आयुर्वेदिक डॉक्टर, आशा सेविका, समाजसेवक, दोन एएनएम परिसेविका अशी पाच जणांची टीम कार्यरत असेल. या प्रत्येक उपकेंद्रावर गावातील पाच हजार लोकसंख्येची जबाबदारी असणार आहे. या केंद्रात काम करणा-या डॉक्टरांना २५ हजार रुपये पगार देण्यात येईल. आता १,२१४ उपकेंद्रासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवला असून यामध्ये गडचिरोली, नंदुरबार, वाशीम, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर,सिंधुदुर्ग आणि जळगाव यांसारख्या आणखी १० जिल्ह्यांचा समावेश आहे. या केंद्रात गरोदर महिलांना व नवजात बाळांवर उपचार, फॉमिली प्लॅनिंग, गर्भनिरोधक समस्येवर उपाय, सर्वसाधारण संसर्गजन्य आजार, मानसिक आजार, पॅलेटिव्ह केअर आणि स्क्रिनिंग केले जाईल.