एका भ्रमणध्वनीवर जि.प.च्या स्थायी समितीची सभा स्थगीत

0
5
गोंदिया,दि.06- सद्यस्थितीत जिल्हावासीयांना पाणी टंचाई व भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आज ६ एप्रिल रोजी रोजी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत पाणी टंचाईवर चर्चा सुरू असताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई मडावी यांना अचानकणे एक भ्रमणध्वनी आल्याने जि.प.अध्यक्षाने चक्क सुरू असलेली स्थायी समितीची सभाच स्थगित केल्याचा खळबळजनक प्रकार  गोंदिया जिल्हा परिषदेत घडला. विशेष म्हणजे,या स्थायी समितीच्या सभेला चक्क भाजपाचे तीन सभापती व एक सदस्य गैरहजर होते. त्यामुळे भाजपाचे सभापती अनुपस्थीत असल्याचे स्थायी समितीची सभा स्थगित तर करण्यात आली नाही. अशा चर्चांना जिल्ह्यात पेव फुटले आहे.
 सविस्तर असे की, जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा जि.प. अध्यक्षा सीमा मडावी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कोरम पुर्ण असल्याने सुरू झाली. ती सभा ४ वाजेपर्यंत सुरळीत सुरू होती. सभेच्या सुरूवातीला सडक/अर्जुनी पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी आनंद लोकरे यांचा व्यवहार व वर्तणुकीवर नेहमी होत असलेल्या आरोपाबाबद सदस्यांनी सभेत मुद्दा उपस्थित केला. त्यावर आपली बाजू मांडण्यासाठी खंडविकास अधिकारी आनंद लोकरे हे उभे राहून बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत होते.परंतु त्यांच्या उत्तराने सदस्यांचे समाधान झाले नाही,त्यातच लोकरे यांनी बैठक सुरु असतानाच आपली बॅग घेऊन सभागृह सोडल्याचे सांगण्यात येत आहे.त्यांच्या या वर्तणुकीमूळे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. राजा दयानिधी यांनी लोकरे यांच्या  वर्तणुकीबद्दल निलंबनाचा प्रस्ताव तयार करण्याचे सभागृहाला आश्वासन दिले. त्यानंतर जिल्ह्यातील पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यात हातपंपाकरीता सात हजार पाईपची गरज असल्याचे सांगत तीन हजाराच्यावर पाईप पोहचल्याचे सांगत उर्वरीत पाईप येत्या एक-दोन दिवसात संबंधित पंचायत समितीला पोहचतील. अशी माहिती संबंधित अधिकाNयांनी दिली. या सर्व चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर, सुरेश हर्षे,राजलक्ष्मी तुरकर, काँगे्रसचे पी.जी.कटरे व उषा शहारे आदींनी सहभाग घेतला. सभा सुरू असताना दरम्यान, अध्यक्षा सीमा मडावी यांना अचानकपणे त्यांना भ्रमणध्वनी आला. त्या भ्रमणध्वनीवरील संदेश ऐकल्यानंतर त्यांनी सरळ सभा स्थगित करण्याची घोषणा करीत ही सभा येत्या दोन-तीन दिवसात घेण्यात येणार असल्याचे सांगितले. या सभेला शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले, महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्यासह सीईओ,अतिरिक्त सीईओ, सामान्य प्रशासनचे उपमुकाअ यांच्यासह इतर अधिकारी हजर होते. सभापती हजर असतानादेखील अध्यक्षांनी सभेचे उर्वरीत कामकाज त्यांचेकडे न सोपविता सभा स्थगित करणे हा आपल्याच पक्षातील सभापतींवर दाखविलेला अविश्वास तर नव्हे ना,अशा चर्चांना ऊत आले आहे.जिल्ह्यात भिषण पाणीटंचाईसारखे विषय असताना आणि सभा सुरळीत सुरु असताना आपल्या सहकारी सभापतीवर विश्वास ठेवत अध्यक्षांनी कामकाज सुरु ठेवत निघायला हवे होते असे काँग्रेसच्यागी गोटात चर्चा सुरु होती.