चिंकारा शिकार प्रकरण ४ वर्षांपासून प्रलंबित, धर्मराव आत्राम आरोपी

0
9

पुणे,दि.07ः – बारामती तालुक्यातील दोन चिंकारांची हत्या करून त्यांचे मांस खाल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात सुरू असलेला खटला प्रलंबित आहे. जबाबाच्या मुद्द्यावर निकाल न झाल्याने गेल्या चार वर्षांपासून हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सासवड न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची प्रक्रिया थांबलेली आहे.
काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खानला गुरुवारी जोधपूर न्यायालयाने पाच वर्षे तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांना निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे बारामती येथे झालेले चिंकारा शिकार प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आरोपींचे जबाब पुरावे म्हणून ग्राह्य धरता येतील की नाही, यावर मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या वादामुळे सुनावणी थांबलेली आहे.
१४ जून २००८ च्या मध्यरात्री सोमेश्वरनगरमध्ये तीन आलिशान गाड्यांतून आलेल्यांनी हरणाची शिकार केल्याची तक्रार चौधरीवाडी येथील ग्रामस्थांनी दिली होती.
तपासानंतर लाल दिव्याची ती गाडी राज्यमंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अत्राम यांच्यासह इतर आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ आणि वन कायदा १९२६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सुरेश बिरमाणे, रवींद्र वाडकर, महेश बिरमाणे, रवी सोराप, अंकुश सानस, प्रभाकर वाघ, सय्यद अली हुसेन अशी इतर आरोपींची नावे आहेत.

याबाबत जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी सांगितले की, सासवडचे तत्कालीन विभागीय वन अधिकारी एस. जी. धुमाळ या प्रकरणात तपास अधिकारी होते. त्यांनी आत्राम यांच्यासह सर्व आरोपींचे जबाब नोंदवले होते. या प्रकरणात दिलेल्या पुराव्यांवर बचाव पक्षाने आक्षेप घेतला होता. या संदर्भात स्पष्टीकरणासाठी २०१४ मध्ये हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. तेव्हापासून उच्च न्यायालयाने कोणतेही आदेश दिलेले नाहीत. जोपर्यंत उच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत पुढील जबाब घेता येणार नाहीत.