सोमवारी जिल्हा काँग्रेसचे भंडाऱ्यात एकदिवसीय उपोषण

0
8

देशात तसेच राज्यात जातीय, सामाजिक व धार्मिक देढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न- प्रेमसागर गणवीर

भंडारा,दि.७- सोमवार ९ एप्रिल रोजी जिल्हा काँग्रेस तर्फे जिल्हामुख्यालयात माजी खासदार नाना पटोले यांच्या नेतृत्वात एकदिवसीय धरणे उपोषण आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासन व तसेच भाजप प्रणित इतर राज्य शासनाच्या चुकीच्या व द्वेषपूर्ण भूमिकेमुळे देशातील शांतता व सामाजिक सलोखा नष्ट झाल्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी दिली आहे.२ एप्रिल २०१८ रोजी विविध संघटनांच्या माध्यमातून भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्या दिवशी भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे अनेक ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या व हिंसाचार उफाळून आला. आणि त्यात अनेक निष्पाप जीव बळी पडले. त्याचप्रमाणे देशभरातील विविध राज्यांत जाणीवपूर्वक जातीय, सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणीविर यांनी राज्य व केंद्र सरकारवर केली. पश्चिम बंगाल, बिहार तसेच उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये झालेल्या दंगलीमागे भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता हे स्पष्ट झाले आहे. बिहारच्या दंगलीकरिता केंद्रातील मंत्री अश्विन चौबे यांचे पुत्र अरिजित शाश्वत यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. महाराष्ट्रातही भीमा-कोरेगाव येथे मराठा आणि दलित समाजामध्ये जाणीवपूर्वक संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला हे स्पष्ट झाले आणि त्याकरिता भाजपाशी जवळीक असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे यांचा सहभाग होता असे स्पष्ट असतांना भाजप सरकारतर्फे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे असे संघर्ष निर्माण करणे हे भाजपच्या रणनीतीचा भाग आहे का? असा प्रश्न प्रेमसागर गणवीर यांनी उपस्थित केला. याचे कारण म्हणजे हे सर्व दुर्दैवी प्रकार टाळण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकारने कोणतेही उचित पाऊल उचलले नाही. देशातील व राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेला जाणूनबुजून धोका पोहचविण्याचा प्रयत्न होत असतांना काँग्रेस पक्ष त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे गणवीर यांनी स्पष्ट केले. देशामध्ये व राज्यामध्ये विषारी जातीयवाद पसरविण्याचा प्रयत्न सत्तारूढ भाजपकडून होत असतांना काँग्रेस पक्षाची जबाबदारी वाढली असून देशामध्ये व राज्यामध्ये सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याची कामगिरी काँग्रेस पक्षाला करावी लागणार आहे असे कार्यकर्त्यांना उद्देशून आवाहन सुद्धा यावेळी केले. याचाच एक भाग म्हणून सोमवार, ९ एप्रिल २०१८, सकाळी १० वाजता पासून स्थानिक भंडारा येथील गांधी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ  नाना पटोले यांच्या नेतृत्वात एक दिवसीय उपोषण करण्यात येणार असल्याचे प्रेमसागर गणवीर यांनी कळविले.
धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते मंडळी, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश प्रतिनिधी, आजी-माजी जिल्हापरिषदेचे पदाधिकारी, आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी पंचायत समिती सदस्य, आजी-माजी नगर परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी-माजी संचालक, सहकार क्षेत्रातील नेते मंडळी, जिल्हा पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य, तालुका अध्यक्ष व कार्यकारिणी सदस्य, महिला काँग्रेस, युवक काँगेस, एन.एस.यू.आय., सेवा दल तसेच विविध विभाग व सेलचे तालुका अध्यक्ष व सदस्य यांनी व जनतेनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर व महेंद्र निंबार्ते यांनी केले.