मी अधिकृतपणे भाजपचा कार्यकर्ता – सदाभाऊ खोत

0
6

सांगली,दि.08)विशेष प्रतिनिधी – रयत क्रांती संघटना हा पक्ष नाही, मी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. माझा भाजप प्रवेश झाला आहे, असा खळबळजनक खुलासा आज कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते.सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देण्याआधीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी ही प्रक्रिया उरकली होती. “गळ्यात हार घालून सोहळा करण्याची गरज नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांची ओळख आता भाजपचे नेते अशी करावा लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्यसभेसाठी अर्ज करताना ते पक्ष कोणता सांगणार? असा मुद्दा चर्चेला आला होता. कारण, विधान परिषद किंवा राज्यसभेला ज्या पक्षाकडून अर्ज दाखल करायचा त्याचे सभासद असणे गरजेचे असते. त्याच मुद्यावर आज सदाभाऊंना छेडले असता त्यांनी हा मोठा खुलासा केला. सदाभाऊ छातीला रयत क्रांती संघटनेचा बिल्ला लावतात आणि गळ्यात भाजपचे उपरणं घालतात, मात्र त्यांनी भाजप प्रवेश केला नाही, असाच कार्यकर्त्यांसह सर्वांचा समज होता. तो आज दूर झाला. सदाभाऊ म्हणाले, “मी भाजपचा क्रीयाशील सभासद आहे. विधान परिषदेसाठी ए बी फॉर्म भरतानाच मी भाजप प्रवेश केला आहे.” एकाचवेळी भाजप व रयत क्रांती संघटना या दोन्ही ठिकाणी सभासद कसे राहता येईल, या प्रश्‍नावर ते म्हणाले, “रयत क्रांती संघटना ही राजकीय पक्ष नव्हे. लोकहितासाठी काम करणारी ती संघटना आहे. त्यामुळे मी भाजपचा असण्याचा आणि संघटनेचा तांत्रिक अडचणीचा विषय येत नाही.”