मेडिकल काॅलेजला मिळणार सीटी स्कॅन मशिन

0
20

गोंदिया,दि.09 : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडीकल कॉलेज) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ही बाब हेरुन वैद्यकीय सेवा संचालनालयाने नवीन सीटी स्कॅन मशिनसाठी प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचे निर्देश मेडीकल कॉलेजचे अधिष्ठाता यांना शुक्रवारी (दि.६) दिले. त्यानंतर अधिष्ठाता यांनी संबंधित विभाग प्रमुखांना त्वरीत प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचे निर्देश दिले आहे.

केटीएस रूग्णालयात असलेली मशिन नादुरूस्त असून  रूग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले होते. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी हा विषय राज्य सरकारच्या आरोग्यमंत्रालयापर्यंत नेला व मशिन दुरूस्त करवून घेतली होती.सोबतच त्यांनी नवीन मशिन लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची मागणी केली होती. तसेच नवीन मशिनसाठी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला. त्याचे फलीत असे की, नवीन मशिनच्या तीन कोटींच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असून निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ६६ लाख रूपयांचा निधीही देण्यात आला आहे.
सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात एक सीटी स्कॅन मशीन आहे. मात्र या मशिनमध्ये वांरवार बिघाड येत असल्याने त्याचा फटका गोरगरीब रुग्णांना सहन करावा लागतो. परिणामी खासगी रुग्णालयात त्यासाठी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. सीटी स्कॅन मशीन बंद राहत असल्याने अनेकदा रुग्णांच्या रोषाला सुद्धा डॉक्टरांना सामोरे जावे लागते. मेडीकलचा सर्व कारभार सध्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातूनच सुरू आहे.
हीच बाब लक्षात घेत वैद्यकीय सेवा संचालनालयाने मेडीकल कॉलेजला नवीन सीटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मेडीकल कॉलेजकडून नवीन सीटी स्कॅन मशिन खरेदीसाठी तातडीने प्रस्ताव मागविण्यात आला आहे. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. रुखमोडे यांनी ६४-सलाईड्स ही नवीन सीटी स्कॅन मशिन मागविण्याचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले आहे.
नवीन तंत्रज्ञानापासून निर्मित या मशिनचा लाभ जिल्ह्यातील रुग्णांना मिळणार आहे. विशेष म्हणजे, मेडीकल कॉलेज स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सीटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन देण्यात आली नव्हती. अद्यापही मेडीकल कॉलेजची वैद्यकीय सेवा केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या भरवशावर सुरु आहे. त्यामुळे नवीन सीटी स्कॅन मशिन उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. आता रू ग्णालयात नवीन मशिन आल्यावर रूग्णांना बाहेर पैसे खर्च करावे लागणार नाही. एकंदर रूग्णांसाठी लाभदायक ठरणार आहे.