नागपूरात सरकारविरोधात असंतोषाचा लाल सलाम

0
9

नागपूर दि.१०ः: भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. आंदोलनात कॉ. श्याम काळे, कॉ. अरुण वनकर, डॉ. महेश कोपुलवार, हिरालाल येरमे, प्रकाश खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, संजय वाकडे, होसलाल रहांगडाले, नामदेव कन्नाके, संतोष दास, प्रकाश रेड्डी, सदानंद इलमे, हिवराज उके, माधवराव बांते, असलम पठाण, सुधाकर वाघुके आदींचा सहभाग होता.
भाकपाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात नेहरू बालोद्यान, सुभाष रोड येथून हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आंदोलनकारी सहभागी झाले. शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी कर्मचारी, पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, असंघटित कामगार,जबरान जोत आदिवासी, महिला, युवक, विद्यार्थी यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात सभा घेण्यात आली. यामध्ये कॉ. भस्मे यांनी सरकारला धारेवर धरले. गेल्या ७० वर्षांत देशातील ४८ टक्के संपत्ती १ टक्का लोकांच्या हातात होती. मात्र भाजपा सरकारच्या चार वर्षाच्या काळात यामध्ये प्रचंड वाढ झाली असून, आता देशाची ७३ टक्के संपत्ती एक टक्का लोकांच्या हातात गेल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात शिक्षणाचे व्यापारीकरण झाले, बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली, दलित, अल्पसंख्यांकावर हल्ले वाढले आणि पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याची टीका त्यांनी केली.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळग्रस्त शेतक ऱ्याना तत्काळ मदत, शेतमालाला दीडपट भाव मिळावा, जबरान जोतधारकांना वनजमिनीचे हक्क देण्यात यावे, अंगणवाडी, पोषण आहार व ग्रामपंचायत कर्मचा  ऱ्या च्या मानधनात वाढ व्हावी,झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे, बेरोजगारांना काम अशा विविध मागण्या करण्यात आल्या.