जिल्हाधिकार्यांनी केला वाहन चालकाचा वाढदिवस साजरा

0
9

नांदेड(नरेश तुप्टेवार)दि.10ः प्रशासनातील सर्वोच्च पद, मानमरातब, जबाबदाऱ्या एवढं सगळं असतानाही मनातील माणुसकीचा झरा सगळ्यात महत्वाचा. असेच व्यक्तिमत्व म्हणजे नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका,शासनाचा रेटा आणि विविध कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाभर दौरे, कामाचा प्रचंड व्याप असला तरी आपल्या स्वभावाने आणि प्रशासनातील या सर्वोच्च पदाचा सर्वसामान्यांसाठी कसा उपयोग करण्यात येईल यासाठी सातत्याने कार्यमग्न अशीच त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. त्यांच्यातील सहृदयतेचे दर्शन नुकतेच घडले. नियोजन भवन मध्ये जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची विविध विषयांवर अत्यंत महत्वाची व जिल्ह्यातील विविध कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी गंभीर असलेल्या जिल्ह्याधिकाऱ्यांचे वेगळेच रूप समस्त अधिकारी आणि कर्मचार्यांना पाहायला मिळाले. निमित्त होते जिल्ह्याधिकाऱ्यांचे वाहन चालक मधूकर वाठोरे यांच्या वाढदिवसाचे. बैठकीत विविध प्रश्नांवर अधिकाऱ्यांची झाडाझडती घेणारे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांना आपल्या वाहन चालकाचा आज वाढदिवस असल्याचे समजले. तेव्हा त्यांनी तात्काळ सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमवेत आपल्या या सहकार्याचा वाढदिवस पुष्प गुच्छ देऊन तसेच केक कापून स्वतः केक त्यांना भरवून साजरा केला. प्रशासनातील एखाद्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आपल्या वाहनचालकाचा असा वाढदिवस साजरा करण्याची कदाचित पहिलीच घटना म्हणावी लागेल. जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी आपल्या वाहनचालकाचा वाढदिवस साजरा करणे यापेक्षाही या आनंदी क्षणात सर्वाना सहभागी करून आपल्या सहकाऱ्यांना सुखद धक्का देऊन आपल्यातील माणुसकीचे आणि सहृदयतेचे दर्शनच घडविले असेच म्हणावे लागेल.