सामाजिक समता सप्ताहानिमीत्त योजनांची माहिती व धनादेशाचे वाटप

0
11

गोंदिया,दि.११ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्ताने ८ ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहानिमीत्त ११ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळाच्या योजनांची माहिती व लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रभारी व्यवस्थापक श्री.शिवणकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.ठाकूर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.उके, ओबीसी महामंडळाचे लेखापाल श्री.मुळे यांची उपस्थिती होती.
श्री.शिवणकर यांनी प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सुधारित बीज भांडवल योजना याबाबत माहिती दिली. श्री.रामटेके यांनी स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाअंतर्गत राहूल अंबादे, राष्ट्रपाल पंचभाई, दुर्योधन बुंदेले, प्रमोद वालदे, जयमाला भालेराव, मंजू डोंगरे, जितेंद्र नागभिरे, कपुरचंद रंगारी, प्रतिभा मेश्राम, रिना सतदेवे, सुभाष बडोले, जगदिश बडोले, विकास बगडे, राजेंद्र नंदेश्वर, हर्षलता शहारे यांना विविध व्यवसायासाठी कर्ज मंजूर रकमेपैकी १० हजार रुपयाचा अनुदानाचा धनादेश, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या कुसूमराज बावणे व अनिता रणदिवे, पंकज वासनिक व गया पंचबुध्दे, सुशिल रामटेके व नेहा बिसेन, सुनिल कोसरे व रागिनी असाटी, रविंद्र गणवीर व सोनी पटले, विराज शहारे व ज्ञानेश्वरी बनकर, योगेशपुरी गंगादर्याव व निशा आयले यांना प्रत्येकी ५० हजार रुपयाचा धनादेश, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाअंतर्गत शेळीपालन व्यवसायासाठी गुलाब बावणे व मधोराम बावणे यांना अनुदान म्हणून १० हजार रुपयाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या विविध महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शेखर श्रीखंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री.महाजन यांच्यासह विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विविध योजनांचे लाभार्थी, बेरोजगार युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार श्री.मुळे यांनी मानले. संचालन प्रदिप ढवळे यांनी केले.