पालकमंत्र्यांच्या हस्ते पोस्टर्सचे विमोचन

0
7

गोंदिया,दि.११ : शेतामध्ये किटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या विषयावरील पोस्टर्सचे विमोचन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा सभेत केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.कृषि समिती सभापती शैलजा सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, गोरेगाव तहसिलदार कल्याणकुमार डहाट, तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांची उपस्थिती होती.
किटकनाशकांची पिकांवर फवारणी करतांना काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना विषबाधा होवून त्यांना आपला जीव गमवावा लागला. फवारणी करतांना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने तहसिलदार व तालुका कृषि अधिकारी गोरेगाव यांच्या संयुक्त वतीने हे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. येणाऱ्या खरीप हंगामात गोरेगाव तालुक्यातील सर्व गावात सदर पोस्टर लावून व त्याबाबत जनजागृती सभा घेवून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यावेळी विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सर्व तहसिलदार, सर्व तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.