जलयुक्त शिवार योजनेची कामे जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

0
7

मुंबई,दि.12 : राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून तीन वर्षांत 16 हजार 521 गावांची निवड करण्यात आली त्यापैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली असून उर्वरित गावे जून 2018 अखेर पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी निवड करण्यात आलेल्या 6200 गावांमध्ये कामे तातडीने सुरु करावीत. राज्यात 76 हजार 106 शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून 77 हजार विंधन विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे ते पूर्ण करण्यासाठी त्याला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात दिले.
मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, विंधन विहिरी, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई व शबरी घरकुल योजनांचा आढावा घेतला. यावेळी जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, मुख्य सचिव सुमित मल्लिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण
जलयुक्त शिवार योजनेचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले, या योजनेत निवडलेल्या गावांपैकी 11 हजार 247 गावे जलपरिपूर्ण झाली आहे. गेल्या वर्षी निवडण्यात आलेली 5031 गावे जून 2018 अखेरपर्यंत जलपरिपूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावे. ज्या जिल्ह्यांमध्ये या योजनेची कामे पूर्ण झाली नाहीत तेथे गती देऊन वेळापत्रकानुसार काम पूर्ण करावे.
नागपूर, वर्धा, नंदूरबार, उस्मानाबाद, चंद्रपूर, भंडारा, सिंधुदुर्ग, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये योजनेचे काम 80 टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले. जेथे काम अपूर्ण आहे तेथे अधिक लक्ष देऊन वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. यासंदर्भात आढावा घेण्यासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सन 2018-19 साठी 6200 गावांची निवड झाली असून त्यामध्ये कोकण विभागातील 300, पुणे 900, नाशिक 1100, औरंगाबाद 1400, अमरावती 1300, नागपूर 1200 गावांची निवड करण्यात आली आहे. 30 जून 2018 पर्यंत टप्पा एकनुसार कार्यवाही करण्यात यावी. नोव्हेंबर ते मार्च 2019 पर्यंत टप्पा एकमधील कामे पूर्ण करुन ही गावे जलपरिपूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार योजनेसाठी निधीची कुठलीही कमतरता नसून ही कामे वेळेत पूर्ण होण्याकरिता एक हजार कोटी रुपयांचा निधी उद्या वितरित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण भागात पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. अशा भागात विशेष लक्ष देऊन योजनेची अंमलबजावणी करावी, जेणेकरुन या भागाला भविष्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार नाही.
1 कोटी 40 लाख 97 हजार 856 घनमीटर गाळ काढला
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत राज्यातील 2900 धरणांमधून आतापर्यंत 1 कोटी 40 लाख 97 हजार 856 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अभियानांतर्गत अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. शेतीच्या कामांसाठी गाळ वापरुन उरलेल्या गाळाचा नाविन्यपूर्ण वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
76 हजार 106 शेततळ्यांचे काम पूर्ण
राज्यात मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत 1 लाख 12 हजार 311 शेततळ्यांचे उद्दिष्ट असून त्यापैकी 34 जिल्ह्यांमध्ये 76 हजार 106 शेततळी पूर्ण झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 8 हजार 99 शेततळे पूर्ण करण्यात आली आहे. नरेगा, धडक सिंचन विहिरी, 11 हजार सिंचन विहिरी योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत 1 लाख 265 विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत 33 जिल्ह्यांमध्ये 76 हजार 689 विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी शबरी, रमाई घरकुल योजनेचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 10 लाख लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून त्यांना घर बांधणीचा पहिला हप्ता तातडीने वितरित करावा. या कामाबाबत सातत्याने नियंत्रण ठेवून ही कामे वेळेत पूर्ण होतील यासाठी पाठपुरावा करावा. 2019 अखेर सर्व लाभार्थ्यांचे घरकुलांचे बांधकाम पूर्ण होईल यासाठी मिशन मोडमध्ये काम करावे, जेथे मनुष्यबळाची कमतरता आहे त्या ठिकाणी आऊटसोर्सिंग द्वारे तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामे पूर्ण करावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.