आगार व्यवस्थापक व वाहतूकनिरीक्षकांना अटक

0
15

ब्रम्हपुरी,दि.13ः-बदलीच्या जागेवर तक्रारदाराला सोडण्यासाठी १0 हजारांची लाच मागणार्‍या ब्रम्हपुरी आगारातील आगार व्यवस्थापक विलास पाध्ये व वाहतूक निरीक्षक राजू पांडव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवार ११ एप्रिल रोजी तडजोडी अंती १,५00 रुपयाची लाच घेताना अटक केली.
तक्रारदार हा महाराष्ट्र राज्यपरिवहन मंडळाच्या गडचिरोली विभागात कार्यरत होता. त्याने २0१२ मध्ये अमरावती विभागात बदली होण्यासाठी विनंती अर्ज केला होता. त्या अनुषंगाने तक्रारदाराची अमरावती विभागात बदली करण्यात आली. तसा कार्यमुक्तीचा आदेशही देण्यात आला होता. परंतु, तरही तक्रारदाराला बदलीच्या ठिकाणी सोडण्यात आले नाही. म्हणून तक्रारदारांने आगार व्यवस्थापक विलास पाध्ये व वाहतूक निरीक्षक राजू पांडव यांना चार पाच वेळा भेटून बदलीच्या ठिकाणी सोडण्याची विनंती केली. परंतु, तरीही तक्रारदाराची ही विनंती मान्य करण्यात आली नाही. तक्रारदार हे ७ एप्रिल रोजी आगार व्यवस्थापक पाध्ये यांना भेटले असता, त्यांनी पांडव यांना भेटण्यास सांगितले. पांडव यांनी बदलीच्या ठिकाणी सोडण्यासाठी १0 हजार रुपये द्यावे लागतील असा पाध्ये यांचा निरोप सांगितला. हि रक्कम न दिल्यास बदलीच्या ठिकाणी सोडण्यात येणार नाही असे ही सांगण्यात आले. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांचेकडे तक्रार दाखल केली. त्यावरून बुधवार ११ एप्रिल रोजी ब्रम्हपुरी आगार येथे केलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान राजू राजाराम पांडव यांनी आगार व्यवस्थापक विलास पाध्ये यांच्या सांगण्यानुसार तडजोडीअंती १,५00 रुपये लाचेची मागणी केली होती. सदर रक्कम स्वीकारीत असताना वाहतूक निरीक्षक राजू राजाराम पांडव व आगार व्यवस्थापक विलास पाध्ये यांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली.
सदर कारवाई पोलिस उपायुक्त पी. आर. पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक माहुरकर , पोलिस उपअधीक्षक डि. एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. पुरुषोत्तम चौबे तसेच कार्यालयीन कर्मचारी मनोहर एकोणकर, महेश मांढरे, अजय बागेसर, रवि ठेंगळे आणि पोलिस शिपाईराहुल ठाकरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली