पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राथमिकता- पालकमंत्री बडोले

0
15

६ ठिकाणी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे भूमीपूजन
गोंदिया,दि.१३ : ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबावी आणि त्यांना पुरेशा प्रमाणात शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याला आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१२ एप्रिल रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील आमदार आदर्श गाव योजनेतील दत्तक घेतलेल्या वडेगाव/सडक येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे भूमीपूजन श्री.बडोले यांनी केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवणे, पं.स.सभापती गिरीधारी हत्तीमारे, उपसभापती राजेश कठाणे, सरपंच हेमराज खोटेले, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.शेगावकर, गटविकास अधिकारी श्री.लोकरे यांची उपस्थिती होती.
श्री.बडोले म्हणाले, जिल्ह्यातील ज्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी योजनेची आवश्यकता आहे अशा गावांचा समावेश मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेत करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार आहे. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी देखील खोल जात आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता ग्रामस्थांनी घेवून पाण्याचा काटकसरीने वाटप करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्री.परशुरामकर म्हणाले, शासनाच्या अनेक योजना चांगल्या आहेत. परंतू योजना राबवितांना यंत्रणा कमी पडत आहे. लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली तर नक्कीच त्या योजनांचा ग्रामस्थांना लाभ मिळू शकते असे त्यांनी सांगितले.
श्रीमती सोनवणे म्हणाल्या, गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी ही उपयुक्त योजना आहे. ही योजना या गावांमध्ये यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी परिश्रम घेतले. ही योजना पूर्ण होताच ग्रामस्थांना नियमीत शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.हत्तीमारे म्हणाले, पाण्याचे महत्व अनन्यसाधारण आहे. ग्रामस्थांनी योजना योग्यप्रकारे राबवून त्याचा लाभ घ्यावा. पाण्याचा वापर काटकसरीने व योग्य प्रमाणात ग्रामस्थांनी करावा असेही ते म्हणाले.
श्री.कठाणे म्हणाले, पाण्याची आवश्यकता पडल्यास योजनेची आठवण येते. या योजनेच्या पुर्ततेसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ग्रामस्थांना शुध्द व स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते वडेगाव येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होणार आहे. गावची सन २०३३ ची लोकसंख्या गृहीत धरुन ४८३ कुटूंबांसाठी प्रति व्यक्ती ४० लिटर याप्रमाणे १ लक्ष ८ हजार ६८० लिटर प्रति दिन पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेवर ५७ लाख ५७ हजार ४५० रुपये खर्च होणार आहे.
पालकमंत्री बडोले यांनी सडक/अर्जुनी तालुक्यातील वडेगाव(सडक), खजरी(डोंगरगाव), डोंगरगाव(खजरी), कोहळीटोला(आदर्श), डव्वा, गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथे मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन केले.
सडक/अर्जुनी तालुक्यातील खजरी(डोंगरगाव) येथील पाणीपुरवठा योजनेवर ५५ लाख ५२ हजार ४४१ रुपये, डोंगरगाव(खजरी) येथील पाणीपुरवठा योजनेवर ५३ लाख ९८ हजार ५५९ रुपये, कोहळीटोला(आदर्श) येथील पाणीपुरवठा योजनेवर ५२ लाख ६२ हजार ४९९ रुपये, डव्वा येथील पाणीपुरवठा योजनेवर ८६ लाख ४८ हजार १७० रुपये, गोरेगाव तालुक्यातील पिंडकेपार येथील पाणीपुरवठा योजनेवर ६३ लाख रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे संबंधित गावच्या ग्रामस्थांना योजना पूर्ण होताच शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या भूमीपूजन कार्यक्रमाला संबंधित गावच्या ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शाखा अभियंता श्री.वाघमारे व श्री.चव्हाण यांनी मानले.