सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

0
34

नागपूर,दि.14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रम, व्याख्यानमाला आयोजित करून तर कुणी समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी करतात. मात्र सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील डॉक्टर विद्यार्थ्यांनी सलग १८ तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिप्रेत अशी अनोखी जयंती साजरी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनच्यावतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी हा अनोखा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमाचे हे २० वर्षे आहे. शुक्रवार १३ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेपासून या उपक्रमास सुरुवात झाली. द्रव्यगुण विभागाच्या एका सभागृहात महाविद्यालयातील पदवीचे (यूजी) ६० विद्यार्थी बसले. यात प्रथम, द्वितीय व अंतिम वर्गाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. उद्घाटनसमयी ६० असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपारी ४ वाजेपर्यंत ७० वर पोहचली. सभागृहात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्याने सभागृह जागा कमी पडली. आजपर्यंत विविध विषयांचा जेवढा अभ्यासक्रम झाला असेल त्या-त्या विषयांचा तेवढा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी पुन्हा वाचून काढला. रात्री १२ वाजेपर्यंत चाललेल्या या उपक्रमात १०० च्यावर विद्यार्थी सहभागी झाले होते. तत्पूर्वी या उपक्रमाचे उद्घाटन बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनोज गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. विजय पात्रीकर उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गेल्या २० वर्षांपासून सलग १८ तास अभ्यास करण्याचा हा उपक्रम राबविल्या जात आहे. या उपक्रमातून शिक्षणाशिवाय मानवाची प्रगती नाही, हा संदेश दिला जातो. या उपक्रमामुळे भविष्यात डॉक्टर बनू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची उजळणीही होते, अशी प्रतिक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र लांबट यांनी दिली.