डॉ.आंबेडकरांचे मोठेपण जगालाही मान्य- जिल्हाधिकारी काळे

0
15

सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
ङ्घ आंतरजातीय विवाहीत जोडप्यांचा सत्कार
गोंदिया,दि.१५ : आपण जन्म कुठे आणि कुणाच्या घरी घ्यावा हे आपल्या हाती नाही. जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा सुख-दु:ख, फायदे-तोटे घेवून येतो. जन्म कुठे घेतला याचा काळ कधीच संपुन गेला आहे. त्याकाळी डॉ.आंबेडकरांनी स्वकर्तृत्वाने जगाला बरेच काही दिले आहे. म्हणून ते महामानव ठरले. त्यांचे मोठेपण भारतानेच नाही तर संपुर्ण जगाने मान्य केले आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले.
१४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन जिल्हाधिकारी काळे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
श्री.काळे पुढे म्हणाले, डॉ.आंबेडकरांच्या जीवनकार्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या कार्यातून आपण काय अंगिकारु शकतो याकडे लक्ष्य देवून त्यादृष्टीने प्रयत्न केले तर त्यांच्या जयंतीदिनी खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन केल्यासारखे होईल. डॉ.आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करुन राजकारणात प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांनी वर्तमानपत्रे काढली, सामाजिक चळवळी उभारल्या. त्यांची राजकीय चळवळ त्या काळातील नेत्यांनी मान्य केली होती. त्यांनी त्यांच्या पक्षाचे राजकीय धोरण ठरवून जाहिरनामा सुध्दा काढला होता. जे कुटूंब लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणेल त्यांना मदत करण्याची तर जे कुटूंब लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणार नाही अशांना शिक्षेची तरतूद त्यांनी केल्याचे श्री.काळे यांनी सांगितले.
डॉ.भूजबळ म्हणाले, महात्मा फुले व डॉ.आंबेडकरांच्या जयंतीच्या माध्यमातून समतेचा संदेश सर्वदूरपर्यंत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भारतीय राज्यघटना ही डॉ.आंबेडकरांच्या प्रचंड अभ्यासातून निर्माण झाली आहे. आज जो एकसंघ भारत दिसतो आहे त्याचा स्त्रोत भारतीय राज्यघटना आहे. डॉ.आंबेडकरांच्या समृध्द अनुभवातून राज्यघटना तयार झाली आहे. डॉ.आंबेडकरांचे विचार आणखी सामर्थ्यशाली कसे होतील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. देशातील विविध जातीधर्माला आचार-विचाराचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने दिले आहे. डॉ.आंबेडकरांनी गौतम बुध्द, संत कबीर आणि महात्मा फुले यांना आपले गुरु मानले. त्यांनी सुध्दा समतेचा संदेश दिला. समतेच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी डॉ.आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून केल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.बेदरकर म्हणाल्या, जे लोक गरीब, निरक्षर आहेत त्यांनादेखील मताचा अधिकार मिळाला पाहिजे यासाठी डॉ.आंबेडकर आग्रही होते. जे शिक्षीत आणि श्रीमंत आहे त्यांनाच केवळ मताचा अधिकार मिळाला तर गरीब समाजाची काय अवस्था झाली असती हा विचार न केलेलाच बरा. डॉ.आंबेडकर हे सामाजिक समतेचे प्रतिक आहे. त्यांनी सुरुवातीला आणि शेवटीही देशाचाच विचार केला. देशाअंतर्गत सर्वप्रथम कुटूंब नियोजनाचा विचार डॉ.आंबेडकरांनी मांडला. महिलांच्या हिताचा विचार करुन डॉ.आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाची निर्मिती केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.खडसे यांनीही डॉ.आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते १० आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा धनादेश, शाल व श्रीफळ देवून, सामाजिक समता सप्ताहानिमीत्त रक्तदान करणाऱ्या व्यक्तींचा, वरिष्ठ लिपीक श्री.खोटेले यांची पदोन्नती व उत्कृष्ट कार्याबद्दल, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक आयुक्त मंगेश वानखेडे यांनी केले. संचालन प्रदिप ढवळे यांनी केले तर आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी मिलींद रामटेके यांनी मानले.