गडचिरोलीत मुख्यमंत्र्याच्या हस्ते महिला व बाल रुग्णालय,नियोजन भवनाचे उद्घाटन 

0
8

गडचिरोली(अशोक दुर्गम),दि.१५- प्रधानमंत्री मोदी यांच्या आकांक्षित जिल्ह्यांपैकी गडचिरोली एक जिल्हा आहे.या जिल्ह्याच्या सर्वागींण विकासासाठी ४० कोटींचा विशेष निधी  देण्यात आला आहे.त्या निधीतून होणार्या विकासात्मक कामामूळे गडचिरोलीला प्रगतीशील जिल्हा करण्याचे उद्दीष्ट गाठायचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी उभारण्यात आलेले जिल्हा महिला व बाल रुग्णालय इमारतीचे लोकार्पण तसेच नियोजन भवनाच्या नवीन इमारत व सभागृह उद्घाटन मुख्यमंत्री यांचे हस्ते आज  (दि.१५) करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे होते.मंचावर आदिवासी विकास व वन राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, क्रिष्णा गजबे, नगराध्यक्ष योगिता पिपरे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मुख्य वनसंरक्षक डब्लू. एटबॉन, विशेष पोलिस महानिरिक्षक शरद  शेलार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांन्तनु गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या इमारत अत्यंत सूंदर असल्याचे वर्णन केले. त्यंत अत्याधुनिक अशा यंत्र व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे येणाºया काळात जिल्हा वासियांना उत्तम उपचार उपलब्ध होतील. तसेच माता व बाल मृत्यू राेखण्यास शक्य होईल असे म्हणाले.माता, बाल आणि अर्भकमृत्यू रोखणे हे आरोग्य विभागाचे ध्येय असून नव्या अद्ययावत रुग्णालयामुळे हे आता शक्य होईल असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी केले. माता व अर्भक मृत्यू रोखण्यासाठी संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. सध्या हे प्रमाण ९५ टक्के आहे ते १०० टक्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे असेही ते म्हणाले.

गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात तसेच नंदूरबार आणि पालघर सारख्या जिल्ह्यात विशेष बाब म्हणून शववाहिनी खरेदीची परवानगी आरोग्य विभागाला मिळावी अशी मागणी, डॉ. सावंत यांनी याप्रसंगी मुख्यमंत्र्यांकडे केली. चामोर्शी सारख्या तालुक्यात आरोग्यसुविधांची कमतरता आहे. जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा वर्कर्स चांगले काम करीत असल्याचे सांगून डॉ.सावंत यांनी जिल्ह्यात शव वाहून नेण्यासाठी शववाहिनी उपलब्ध करुन देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच स्थानिक आमदार डॉ. देवराव होळी यांनी केलेल्या मागणीनुसार येथे १०० खाटांचे रुग्णालय दिले जाईल असे आश्वासन डॉ. सावंत यांनी याप्रसंगी दिले.

जिल्ह्यात या स्वरुपाच्या रुग्णालयाची जिल्ह्यात आवश्यकता होती. शासनाने ती पूर्ण केली असून आता जिल्ह्यातील महिलांना आता उपचारासाठी चंद्रपूर, नागपूर किंवा बाहेरील राज्यापर्यंत जावे लागणार नाही,असे प्रतिपादन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी याप्रसंगी केले. जिल्ह्यात गेल्या तीन साडेतीन वर्षात मोठया प्रमाणात विकास झाला आहे. स्वातंत्र्यापासून जी गावे अंधारात होती त्या गावांना वीज पुरवून सरकारने एक प्रकारे सर्वांचे आयुष्य उजळविले आहे असे ना. आत्राम म्हणाले. यापुर्वीच्या एकाही सरकारने केले नाही. मात्र आपल्या काळात २०० गावांना वीज पुरविण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या जिल्ह्यावर विशेष प्रेम आणि लक्ष आहे. त्यामुळे विकासासाठी निधीची कमतरता त्यांनी पडू दिलेली नाही असेही पालकमंत्री म्हणाले. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांचीही भाषणे झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

गडचिरोली जिल्हा आज हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र  मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हा परिषद अध्यक्ष यागिता भांडेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू  गोयल यांना प्रदान करण्यात आले. यासोबतच संपुर्ण राज्य हागणदारी मुक्त झाले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.