मुख्य बातम्या:
लमाणतांडा येथे जय सेवालाल महाराज जयंती साजरी# #पटेल दाम्पत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिरात 240 रुग्णांची तपासणी# #24 पोलीस अधिकारी कर्माचार्यांचा पोलीस अधिक्षकांच्या हस्ते पद्दोन्नतीपर सत्कार# #तामिळनाडू, दक्षिण एक्स्प्रेसवर आरपीएफची धाड# #पेंढरी तालुक्याची लोकचळवळीतून मागणी# #वरठीचे सरपंच, सचिवांवर कारवाईची टांगती तलवार# #रानडुकराची शिकार; तिघांना अटक# #वेळापूर अकलूज येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी# #डीपीओसह 4 अधिकार्यांवर कारवाई,जिल्हाधिकार्यांनी केले घरभाडे भत्ते बंद# #आम्ही सिंचनाच्या सोयी देऊ ; तुम्ही जोडधंद्यासाठी तयार व्हा : ना. हंसराज अहिर

राज्यात वीज पडून ६ जणांचा मृत्यू

यवतमाळ/लातूर,दि.16ः-राज्यात रविवारी विविध ठिकाणी वीज कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला. अस्मानी संकटाने महागाव व किल्लारी तालुक्यावर वज्राघात केला.रविवारला दुपारी आलेल्या अवकाळी पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी झाडाखाली आश्रय घेणार्‍या चार जणांचा महागाव तालुक्यातील वेणी बुध्द येथे वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला असून, याच दुर्घटनेत अन्य पाच जण मृत्यूशी संघर्ष करीत आहेत. वाकोडी शिवारात घडलेल्या या नैसर्गिक प्रकोपाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पंडित दिगंबर हरणे (३६), अनिल विष्णू सगरूळे (२७), लक्ष्मण रमेश चोपडे (२४) आणि प्रभाकर नारायण जाधव (४७) अशी मृतांची नावे असून, हे सर्व वेणी बुद्ध येथील रहिवासी आहेत.
वीज कोसळून गंभीर जखमी झालेले जितेंद्र शिवराम सुरदुसे (२८), विशाल सूर्यभान सरकाळे (२८), कैलास उत्तम सुरोशे (२१), दत्ता गोविंद मदने (२२) आणि शिवाजी संभाजी बगळे (२६) यांना सर्वांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुसद येथील खासगी रुग्णालयात हलविले आहे. जखमीपैकी जितेंद्र सुरदुसे हा वाकोडी येथील रहिवाशी असून उर्वरित सर्व जखमी वेणी बुद्ध येथील असल्याचे कळते. दुपारी २ वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यात विजांचा कडकडाट आणि जोरदार वादळी वार्‍यासह सौम्य गारपीट व पावसाला सुरुवात झाली. शेतमजुरांनी सुरक्षेसाठी चिंतामण दिगंबर रामटेके यांच्या शेतातील निंबाच्या झाडाखाली आर्शय घेतला. नेमकी याच झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत चौघे जण जागीच ठार झाले तर पाच जण गंभीररीत्या भाजल्याने जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती होताच वाकोडी येथील रवी सुरदुसे, कैलास पाटे, संतोष गारोळे व सहकार यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सवना ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. मृतांपैकी प्रभाकर जाधव शेतकरी आहेत. पंडित हरणे हे गुराखी आहेत. अनिल सगरूळे आणि लक्ष्मण चोपडे हे दोघे शेतमजूर आहेत.या विभागाचे आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजयराव खडसे, सभापती गजानन कांबळे, पं.स. सदस्य शिवाजीराव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. पावसामुळे झाडाखाली पडलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी आणणे शक्य नसल्याने आ. नजरधने यांनी ट्रॅक्टरची व्यवस्था करून सर्व मृतदेह दवाखान्यात पोहोचविले.

लातूर : लातूरमधील किल्लारी येथे शनिवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसादरम्यान अंगावर वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू झाला आहे. राम माधव बिराजदार असे मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली.लातूरमध्ये चार दिवसांपूर्वी हलक्या पावसाच्या सरी आणि सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी दुपारी पुन्हा एक विजांच्या कडकडाटांसह पावसाने हजेरी लावली. त्यावेळी ६0 वर्षीय राम बिराजदार हे आपल्या शेतात झाडाखाली आडोशाला बसले असताना त्यांच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Share