मुख्य बातम्या:

हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य? ; रजिया पटेल

नागपूर,दि.16 : देशात आठ दिवसात उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराच्या दोन घटना म्हणजे अमानवी राक्षसी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. ‘बेटी बचाओ’ आणि महिला सन्मानाचा नारा देणारे सरकार सत्तेत आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा जप करणारी पाठशाळा नागपुरात असतानाही अबोध बालिकेवर अमानुष अत्याचार होऊन त्याचे समर्थन करणारे मोर्चे काढले जातात. यावरून बलात्काराचे समर्थन करणारे हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य, असा सवाल करीत सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी अप्रत्यक्षपणे संघ आणि भाजपा सरकारवर घणाघाती हल्ला केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप रविवारी दीक्षाभूमी येथे झाला. ‘राष्ट्रनिर्मितीकरीता महिलांची भूमिका’ याविषयावर परिसंवादात प्रमुख वक्त्या म्हणून मुस्लीम महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या पुण्याच्या रजिया पटेल बोलत होत्या. डॉ. सरोज आगलावे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या बनारस विद्यापीठाच्या डॉ. इंदू चौधरी यांच्यासह ओबीसी महासंघाच्या शरयू तायवाडे, मंजुषा सावरकर, लेखिका अरुणा सबाने, बेनझीर खान, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता जिचकार आदी उपस्थित होत्या.
त्या म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रनेही कठुआमधील घटनेला भयावह संबोधून निषेध केला आहे. असे असताना काहींनी धर्मद्वेषातून बलात्काराचे समर्थन करणारे मोर्चे काढले, हे त्यापेक्षा भयानक आहे. यामध्ये दोन आमदारांचाही समावेश होता.या घटनात पितृसत्ताक समाजातील लिंगभेदाचे, धर्माचे आणि जातीभेदाचे धागे जुळले आहेत. ही कोणती संस्कृती आहे? वास्तविक ही स्थिती जुनी मनुवादी व्यवस्था आणण्याचे संकेत आहेत. अशा मानसिकतेच्या लोकांना संविधानामुळे महिलांना, दलितांना मिळालेला सन्मान मान्य नाही.
यावेळी इंदू चौधरी यांनी संविधान जिवंत असेपर्यंत बाबासाहेब आमच्यामध्ये जिवंत असल्याची भावना व्यक्त केली. मनुवादी मानसिकतेचे लोक जातीव्यवस्था मानणाऱ्या दुसऱ्यांकडून अत्याचार करतात व स्वत: मात्र गप्प राहतात कारण त्यांना निवडणुका आल्या की तुमचे व्होट हवे असते. हे कोण लोक आहेत, ज्यांना संविधान उद्ध्वस्त करायचे आहे? यावेळी डॉ. सरोज आगलावे यांनीही अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तक्षशीला वाघदरे यांनी केले तर संचालन वीणा राऊत यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे एन.आर. सुटे, चंद्रशेखर गायकवाड आदी उपस्थित होते.

Share