देश आर्थिक आणीबाणीच्या स्थितीत सापडलाय- डेरेक ओब्रायन

0
8

नवी दिल्ली,दि.17(वृत्तसंस्था): देशातील काही राज्यांमध्ये अचानकपणे निर्माण झालेल्या पैशांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी प्रधानमंत्री नरेद्र मोदीवर निशाणा साधला.नोटाबंदीच्या निर्णयानंतर 50 दिवसांमध्ये देशातील परिस्थिती पूर्ववत होईल, असा दावा त्यावेळी मोदींनी केला होता. मात्र, आता दीड वर्ष उलटूनही ही समस्या कायम आहे. ही परिस्थिती म्हणजे देश आर्थिक आणीबाणीत सापडल्याचे द्योतक आहे, अशी टीका डेरेक ओब्रायन यांनी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात पैशांची चणचण निर्माण झाली होती. एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याने पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर रांग लावावी लागत होती. आता पुन्हा नोटाबंदीमध्ये जी परिस्थिती होती त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते आहे. आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून एटीएममध्ये पैशांचा तुटवडा पाहायला मिळतो आहे. याचबरोबर पूर्व महाराष्ट्र, बिहार आणि गुजरातमध्येही कॅश कमी असल्याच्या तक्रारी समोर आल्या. दिल्ली-एनसीआरमध्येही लोकांना एटीएममध्ये चकरा माराव्या लागत आहेत. तसंच गुडगावमधील 80 टक्के एटीएम कॅशलेस झाले आहेत.

नोटाबंदीनंतर जवळपास 5 लाख करोड रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा जारी केल्या गेल्या. या नोटा चलनात आल्यानंतर मोठ्याप्रमाणात नोटांची चणचण दूर झाली. पण आता पुन्हा हे संकट वाढताना दिसतं आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना,मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बँकांचं म्हणणं आहे.